

दीपक शिराळकर
सोलापूर : आज दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्यापारी वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू झाले आहे. डिजिटल युगात संगणक प्रणाली आणि एआयच्या वापर वाढला असला, तरी पारंपरिक जमा-खर्चाच्या वहीचे चोपडीचे महत्त्व आजही अबाधित आहे.
व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन करून आपल्या जुन्या वह्या बंद केल्या असून, आजपासून नव्या वह्यांची सुरुवात केली जात आहे. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाला व्यापारी वर्गात महत्त्व आहे. व्यापारी वर्गाची अशी श्रद्धा आहे की, श्रावण महिन्यात भोलेनाथाला साक्षी ठेवून वह्यांची ऑर्डर दिली जाते आणि पाडव्याला लक्ष्मीचे पूजन करून वहीमध्ये हिशेब लिहिण्यास सुरुवात होते. जे व्यापारी संगणकावर हिशोब ठेवतात, ते देखील फायनल एंट्री करण्यापूर्वी कच्चा हिशोब ठेवण्यासाठी याच हस्तनिर्मित वह्यांचा वापर करतात. यामुळे जुन्या परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत आजपासून व्यापाऱ्यांचे नवे आर्थिक वर्ष उत्साहात सुरू झाले आहे.
सोलापूर येथील पारंपरिक चोपड्या खरेदी करण्यासाठी केवळ सोलापूर जिल्ह्याचेच नव्हे, तर मराठवाडा, पुणे, नगर तसेच कर्नाटक राज्यातील विजापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांतील व्यापारी खास येतात व्यापाऱ्याकडून सांगण्यात आले.
चोपडी निर्मितीची प्रक्रिया
चोपडी निर्मिती आजही हाताने केली जाते. एका वहीच्या निर्मितीमध्ये एक कागद कमीतकमी 21 वेळा हाताच्या टप्प्यातून जातो. कागद रुलिंग करणे, घडी करणे, दाबात ठेवणे, गुटके तयार करणे, टाचन करणे, कटिंग करणे आणि करवतीने होल पाडून पुठ्ठा जोडणे अशी किचकट प्रक्रिया आहे.
70 रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत
पारंपरिक जमा-खर्चाच्या चोपड्यांची वह्यांची किंमत पानांची संख्या आणि कागदाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. या वह्यांची किंमत 70 रुपयांपासून सुरू होते, तर अकाउंट पेपर वापरलेली मोठी वही 5000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.