

सोलापूर : नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई व पुण्यासह अन्यत्र वास्तव्यास गेलेले नागरिक शहर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुण दिवाळीसाठी गावाकडे येत असतात. मात्र, रेल्वेची प्रतीक्षा यादी लांबलचक तर परिवहन महामंडळाच्या बसेस फुल्ल असल्यामुळे मिळेल तिथे बसून वा प्रसंगी उभे राहून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. सोलापूरकडे येणारी प्रत्येक बस व रेल्वे फुल्ल धावत आहेत.
येथील शहर व जिल्ह्यातील अनेक तरुण, तरुणी हे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अन्य शहरात वास्तव्यास आहेत. हे तरुण दिवाळीचा सण गावातील सर्व नातेवाइकांच्या समवेत साजरा करण्यासाठी गावाकडे येतात. नोकरी व व्यवसायानिमित्त दुसरीकडे असलेल्या तरुणांना दिवाळीच्या दरम्यान गावाची ओढ असते. भाऊबिजेला ओवाळूून घेण्यासाठी गावी बहिणीकडे यावे लागते.
सणाच्या काळात रेल्वे व राज्य परिवहन महामंडळाकडूनही वाढीव गाड्यांची सोय केली आहे. तरीही यंदा प्रवाशांची गर्दी मोठी आहे. यामुळे, परिवहन महामंडळाची प्रत्येक एसटी बस व सोलापूरकडे येणारी प्रत्येक रेल्वेही हाउसफुल्ल धावत आहेत. या गाड्या फुल्ल धावत असल्याने प्रवाशांना जागा मिळेल त्या ठिकाणी बसून व प्रसंगी उभे राहून प्रवास करावा लागत आहे. येथे रोजगाराची एकही संधी उपलब्ध नसल्याने शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिकलेली मुले-मुली हे नोकरी व व्यवसायानिमित्त गाव सोडलेले आहेत. यंदाच्या दिवाळीसाठी गावी येतांना यांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेची प्रतीक्षा यादी मोठी तर एसटी फुल्ल असल्यामुळे प्रवासी रेल्वे व एसटीत जिथे जागा मिळेल तिथे बसून प्रवास करत गाव गाठत आहेत.
रेल्वेची प्रतीक्षा यादी मोठी व लालपरी फुल्ल धावत असल्याने खासगी ट्रॅव्हल्सने गाव गाठणाऱ्या प्रवाशांकडून प्रवासासाठी जादा दर आकारले जात आहेत. खासगी ट्रॅव्हल्सवाले जादा दर आकारत असल्याने याचा फटका हा सामान्य प्रवाशांना बसत आहे.