

Pandharpur Wari 2025
पंढरपूर : रुप पाहता लोचनी ।
सुख जाले वो साजणी॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी ।
म्हणूनि विठ्ठली आवडी ॥
सर्व सुखाचे आगरु ।
बाप रखुमादेविवरु ॥
असे हृद्य स्वर म्हणत चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा करत लाखो भाविकांच्या हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरीनगरी दुमदुमली. सुमारे 22 लाख भाविकांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा झाला. यामुळे पंढरीनगरी वैष्णवमय झाली. मठ, मंदिर, संस्थाने, 65 एकर परिसरातील भक्तिसागरातील तंबू, राहुट्यांमधून भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग आहेत.
मानाच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक आषाढी यात्रा एकादशीच्या मुख्य सोहळ्याला पंढरीत दाखल झाले. भाविकांमुळे मठ, मंदिरे, धार्मिक शाळा, संस्थाने गजबजून गेली आहेत.
यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने पंढरपूर येथे भाविकांची प्रचंड गर्दी झाली. असंख्य भाविकांनी चंद्रभागा नदीत स्नानानंतर मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. तितकीच गर्दी रांगेत उभारून पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी झाली. मंदिर समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या दर्शन रांगेत एकादशी दिवशी सुमारे 5 लाख भाविक प्रतीक्षा करत होते. दर्शन रांग पत्रा शेडच्या बाहेर पडून गोपाळपूरपर्यंत पोहोचून येथून पुढे रांझणी रोडवर गेली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शन मिळण्यास सुमारे 12 ते 14 तासांचा अवधी लागत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात येत आहे.
स्नानानंतर दर्शन घेऊन भाविक प्रसाद, पेढे, कुंकू-बुक्का, अगरबत्ती खरेदीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे मंदिर परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजून गेली. प्रासादिक साहित्याची विक्री जास्त होताना दिसून येत आहे. एकादशी, द्वादशी तसेच गोपाळकाल्यापर्यंत बाजारपेठेत मोठी उलाढाल होईल, अशी माहिती स्थानिक व्यापार्यांकडून मिळत आहे.
आषाढी यात्रेत चोर्या रोखण्यासाठी दामिनी पथक तैनात होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री महापूजेला आल्याने विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 8,117 हजार अधिकारी व पोलिस कर्मचारी यात्रेकरिता तैनात करण्यात आले आहेत. 7 ठिकाणी आपत्कालीन विभाग कार्यरत ठेवला होता. भाविकांना काही अडचण आल्यास त्वरित संपर्क करता येत आहे. आरोग्य कर्मचारी, आरोग्य पथके तैनात असल्याने वेळीच भाविकांना औषधोपचार करण्यात येत आहेत.
आषाढी यात्रेकरीता यंदा विशेष रेल्वे गाड्या पंढरपूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. सुमारे 5200 एसटी बसेस भाविकांच्या सेवेकरिता धावत आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत योजना असल्यामुळे महिला भाविकांची संख्या जास्त दिसून येत आहे. शहराबाहेर तात्पुरती चार बसस्थानके तयार करण्यात आली असून त्या त्या विभागाकडे बसेस मार्गस्थ करण्यात येत आहेत.
दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे
65 एकर परिसर ओसंडला
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठुरायाचा रथ काढला जातो. या रथावर खारीक व खोबरे उधळले जाते. असंख्य भाविकांना थेटपणे विठुरायाचे दर्शन होत नाही. त्यांना दर्शन देण्यासाठी प्रत्यक्ष देवच रथयात्रेच्या माध्यमातून दर्शन देतात, अशी भाविकांची धारणा असते. या रथालाही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.