

सांगोला : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये हतीद (ता. सांगोला) येथील महादेव तुकाराम पवार (वय 67) व त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (वय 55) यांचा मृत्यू झाला. लंडनमध्ये असलेल्या मुलाकडे जात असताना त्यांना काळाने गाठले.
हतीद या मूळ गावी ते गेल्या पंधरा दिवसांपूर्वी आले होते. त्यांचे तीन बंधू येथे राहतात. हतीद येथील महादेव पवार हे शेतकरी कुटुंबातील होते. त्यांचा मुलगा महेश हा अहमदाबाद येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे ते पंचवीस वर्षांपासून (नडद, जि. खेडा, गुजरात) येथे राहात होते. महादेव पवार व आशा पवार हे नेहमी हतीद या मूळ गावी सर्व सणानिमित्त व कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी येत जात होते. पवार दाम्पत्याचा लंडनमध्ये शैलेश पवार हा दुसरा मुलगा आहे. तो लंडनमध्ये बेकरी व कोल्ड्रिंकचा व्यवसाय करतो. त्याला भेटण्यासाठी हे पती-पत्नी एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये महादेव पवार व आशा पवार मृत्यूमुखी पडल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.