ahmedabad plane crash | मन सुन्न झालं... ! ; एअर इंडिया विमान अपघातावर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याकडून दुःख व्यक्त

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे देखील केले स्पष्ट
ahmedabad plane crash
ahmedabad plane crashRam Mohan Naidu Kinjarapu 'X'
Published on
Updated on

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये गुरुवारी (दि.१२) दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण दुर्घटनेबद्दल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांनी तीव्र दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या घटनेला "अत्यंत विनाशकारी" संबोधले असून तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याचे देखील म्हटले आहे.

अपघाताची बातमी ऐकून धक्का; केंद्रीय हवाई मंत्री

हवाई वाहतूक मंत्र्यांनी सांगितले की, ते स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला आणि मन सुन्न झाले आहे. आम्ही अत्यंत सतर्क आहोत. मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सर्व हवाई वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणांना त्वरित आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बचाव पथके रवाना करण्यात आली असून, अपघातस्थळी वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. माझ्या भावना आणि प्रार्थना विमानातील सर्व प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत," असे राम मोहन नायडू किंजरापू यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंडनला जाणारे एअर इंडियाचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच कोसळले. विमानात २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. या दुर्घटनेत अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मेघानीनगर परिसरात विमान कोसळले

दुपारी सुमारे २ वाजता अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात हे बोईंग विमान वेगाने खाली येताना दिसले आणि कोसळले. एअर इंडियाने ‘एक्स’ वर दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, "एअर इंडियाची फ्लाईट AI171, अहमदाबाद-लंडन गॅटविक दरम्यान कार्यरत असताना आज, १२ जून २०२५ रोजी एका दुर्घटनेत सापडले. सध्या आम्ही तपशील गोळा करत असून, अधिक माहिती http://airindia.com आणि आमच्या एक्स हँडलवर लवकरात लवकर दिली जाईल".

आम्ही जखमींबद्दल आणि मृतांबद्दल माहिती गोळा करत आहोत

अनेक जखमींना शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळावरून मैलोन्मैल काळ्या धुराचे लोट उठताना दिसत होते. काही वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनी अपघातस्थळाचे चित्रीकरण केले असून त्यात विमानाचे अवशेष दिसत आहेत. आपत्कालीन प्रतिसाद पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली असून त्यांनी वेगाने बचाव, निर्वासन आणि अग्निशमन कार्य सुरू केले आहे. "आम्ही मृतांबद्दल आणि जखमींबद्दल अधिक माहिती गोळा करत आहोत," असे पोलीस उपायुक्त कानन देसाई यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे अधिकारी जयेश खाडिया यांनी सांगितले की, आग विझवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news