सोलापूर, पुढारी वृत्तसेवा: एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार व मुळेगाव तांड्यावरील सराईत गावठी हातभट्टी दारूवाला संजय रामू ऊर्फ रामा पवार (वय 39, रा. मुळेगाव लमाण तांडा, सोलापूर) याच्यावर पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी एमपीडीएअन्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. त्याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सन 2O22 मधील नवीन वर्षाची ही स्थानबध्दतेची पहिली कारवाई आहे.
सराईत गुन्हेगार व हातभट्टी दारूवाला संजय पवार हा त्याच्या साथीदारासह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हातभट्टी दारूचा धंदा करीत होता. तो शासनाचे नियम ढाब्यावर गुंडाळून हातभट्टी दारूची वाहतूक, पुरवठा व विक्री करीत होता. त्याच्यावर एकूण 69 गुन्हे दाखल आहेत. सन 2013, 2019 व 2020 मध्ये क.93 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानूसार, प्रतिबंधक करून देखील त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुटत नव्हत्या. त्यानंतर सुध्दा संजय पवार याने हातभट्टी दारूचा धंदा सुरूच ठेवला होता. सन 2021 मध्ये त्याने 12 गुन्हे केले होते.
सराईत गुन्हेगार व हातभट्टीवाला संजय पवार हा हातभट्टी दारू धंद्याचा मालक आहे. हातभट्टी दारूची वाहतूक करताना तो व त्याचे साथीदार हे त्यांची वाहने ही भरधाव वेगाने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी चालवित असतात. तो त्याच्या बेकायदेशीर धंद्याला विरोध करणार्यास किंवा पोलिसांना माहिती देणार्यास तो व त्याचे साथीदार हे शस्त्रासह मारहाण करतात.
अशा प्रकारे गुन्हेगारी कारवाया करून संजय पवार याने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याच्यामुळे शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचत होती. त्यामुळे पोलिस आयुक्त हरिश बैजल यांनी सराईत गुन्हेगार संजय पवार याच्यावर एमपीडीए अन्वये स्थानबध्देतेची कारवाई केली आहे. व संजय पवार याची रवानगी पुणे येथील येरवडा कारागृहात केली आहे.
पोलिस आयुक्तांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून स्थानबध्देची ही तिसरी व नवीन 2022 मधील ही स्थानबध्दतेची पहिलीच कारवाई आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त हरिश बैजल यांच्या आदेशाने गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, फौजदार विशेंद्रसिंग बायस व एमपीडीए पथकातील पोलिस नाईक विनायक संगमवार, सुदीप शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग धानुरे, अक्षय जाधव, विशाल नवले व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी पार पाडली.
हेही वाचलंत का?