

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या टास्क फोर्सद्वारे कोरोना बाधितांवरील उपचार तसेच औषधी याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. (Maharashtra Task Force)
या टास्क फोर्समध्ये राज्यातील नामवंत डॉक्टर तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. घरात विलगीकरणातील रुग्णांनी नेमके काय करावे ? त्यांनी कोणती काळजी घ्यावी, याची माहिती दिली जाणार आहे.
तसेच एखाद्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याच्या कुटुंबातील, सोसायटीतील आणि आजूबाजूच्या लोकांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनही टास्क फोर्स करणार आहे.
या टास्क फोर्समध्ये डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अर्चना पाटे, डॉ. अनिला मॅथिव्ह, डॉ. भाविन झंकारिया, डॉ. संजय मानकर, डॉ. भक्ती सारंगी, डॉ. अविनाथ फडके, डॉ. सुप्रिया अमेय, डॉ. अरुणा पुजारी, डॉ. संगीता चेक्कर, डॉ. शशांक जोशी, डॉ. हर्षद लिमये तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे.