पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : अगामी आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत टीम इंडियाकडून (Team India) कोणते फलंदाज ओपनिंगला येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच रोहित शर्मासह (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) भारतासाठी सलामीची जबाबदारी पार पाडू शकतो, असे काहींचे मत आहे. मात्र, या विषयावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला आहे. जोपर्यंत या प्रकरणी आपली बाजू किंवा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि अजित आगरकर काहीही बोलत नाहीत तोपर्यंत समोर येणाऱ्या सर्व बातम्या खोट्या आहेत, असे त्याने स्पष्ट केले. ॲडम गिलख्रिस्ट, मायकेल वॉन यांच्याशी एका इंग्रजी पॉडकास्टमध्ये संवाद साधताना त्याने हे विधान केले.
अलीकडेच एका अहवालात म्हटले होते की, हार्दिक पंड्याची (Hardik Pandya) टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीची निवड अडचणीत आली आहे. त्याने आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण गोलंदाजी करण्यात अपयशी ठरत असल्याने संघ व्यवस्थापन निराश आहे. याशिवाय रोहित शर्मासह विराट कोहलीलाही सलामीवीर म्हणून आजमावण्यात येईल, असा दावाही करण्यात आला होता. मात्र हे वृत्त रोहितने नाकारले आहे. पुढील टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताची सलामीची जोडी कोण असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.
या महिन्याच्या अखेरीस टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला जाईल. स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत 1 मे आहे. आत्तापर्यंत फक्त रोहित शर्माच कर्णधार असणार हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी फेब्रुवारीमध्ये त्याच्या नावाची घोषणा केली होती. (T20 World Cup)
टी-20 विश्वचषक स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कोहलीसोबत सलामी करावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, रोहित शर्मासह यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल हे देखील सलामीसाठी पर्याय असतील. पण जैस्वाल सध्याच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. तो फॉर्ममध्ये परत येण्यासाठी धडपडत आहे. तर शुभमन गिलची कामगिरी गुजरात टायटन्ससाठी चांगली होत आहे. शिवाय विराट कोहली या हंगामात त्याचा संघ आरसीबीसाठी सलामी देत आहे आणि त्याने 7 सामन्यात 361 धावा केल्या आहेत. सध्या ऑरेंज कॅप त्याच्या नावावर आहे. तर रोहित शर्माने 6 सामन्यात 261 धावा केल्या आहेत ज्यात एका शतकाचाही समावेश आहे. आता या स्थितीत भारतासाठी कोण सलामी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.