Disputes over farm : माेहाेळ इथं शेतीच्या वादातून एकाचा मृत्यू | पुढारी

Disputes over farm : माेहाेळ इथं शेतीच्या वादातून एकाचा मृत्यू

मोहोळ; पुढारी वृत्तसेवा

बांधाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दुसऱ्या गटातील एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावच्या शिवारात घडली. सुनील बाबुराव घोडके (वय ४५ वर्षे रा. पाटकुल ता. मोहोळ) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, अक्षय संतोष एडके (रा. पाटकुल ता. मोहोळ) असे जखमीचे नाव आहे. (Disputes over farm)

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील अरुण जालिंदर गावडे व सुनील बाबुराव घोडके यांची शेती एकमेकांच्या जवळ आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये बांधाच्या कारणावरून वाद सुरू असून, विविध कारणांनी त्यांच्यात वारंवार खटके उडत असतात.

शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुनील बाबुराव घोडके हा शेतातील बांधावर दगड रोवत होता. यावेळी अरुण गावडे व त्यांचा भाचा अक्षय संतोष एडके यांनी सुनील घोडके याला दगड रोवण्याचे कारण विचारले असता, त्यांच्यात भांडण सुरू झाले. या भांडणात सुनीलने अक्षय एडके याच्या डोक्याला सत्तूर तर सुनील बाबुराव घोडके याच्या डोक्यात जमीन खोदायचे बेडगे लागल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. (Disputes over farm)

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी सुनील घोडके यास उपचारासाठी सोलापूरच्या रूग्णालयात पाठवून दिले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे अक्षय एडके यास पंढरपूर येथील निकम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आलेली नव्हती. या घटनेमुळे पाटकुल सह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button