Kiran Lohar : डिसले गुरुजींवर कारवाईचा प्रस्ताव देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडले घबाड; किरण लोहार यांच्याकडे ५ कोटींवर अवैध संपत्ती | पुढारी

Kiran Lohar : डिसले गुरुजींवर कारवाईचा प्रस्ताव देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याकडे सापडले घबाड; किरण लोहार यांच्याकडे ५ कोटींवर अवैध संपत्ती

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किरण लोहार यांनी लोकसेवक या नात्याने कर्तव्य करीत असताना सेवा कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षा किमतीची बेहिशेबी मालमत्ता संपादित केली. याप्रकरणी किरण लोहार, त्यांची पत्नी व मुलाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. (Kiran Lohar)

सोलापूर जिल्हा परिषदेतील तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (वय ५०) यांचे शिक्षण विभागात कर्तव्य बजावत असताना अनेक तक्रारी पुढे आल्याने कारकीर्द नेहमी चर्चेत राहिली होती. त्याच्या कारभाराच्या चौकशीनंतर त्यांच्याकडे त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा १११.९३ टक्के अधिक संपत्ती आढळली. त्यांनी १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधी ५ कोटी ८५ लाख रुपयांपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचे निष्पन्न झाले. (Kiran Lohar)

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूरचे पोलीस निरीक्षक उमाकांत नेताजी महाडिक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार यांच्याकडे ०५, ८५, ८५, ६२३.८ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली.

किरण लोहार यांना त्यांची पत्नीच्या नावे सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी भ्रष्ट मार्गाने बेहिशेबी मालमत्ता संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केले असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. किरण अनंत लोहार ( वय ५०, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर), पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४) आणि मुलगा निखिल किरण लोहार (वय २५, सर्व रा. प्लॉट नं. सी. २, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी चौकशी अधिकारी म्हणून केली.  पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Kiran Lohar : डॉ. किरण लोहार यांनी डिसले गुरूजी यांना नाकारली होती रजा

शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील येळाणे गावचे रहिवासी आहेत. पण कोल्हापुरातही सेवेत असताना लोहार हे वादग्रस्त राहिले आहेत. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी असताना लोहार यांनी  ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले गुरूजी यांना रजा नाकारली होती. त्यावेळी ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.     

हेही वाचा 

Back to top button