कुडाळ : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा सभापती राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या प्रकरणामध्ये घटनाबाह्य पध्दतीने काम करत आहेत. सर्वाच्च न्यायालयाने निर्देश देऊनही ते घटनाबाह्य पध्दतीने काम करत आहेत. हिंमत असेल तर सभापती नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्वांना पात्र म्हणून जाहीर करून दाखवावे, असे खुले आव्हान ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. असिम सरोदे यांनी दिले. Asim Sarode
'निर्भय बनो' संवाद कार्यक्रम कुडाळ येथे आज (दि.१८) झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, १९८५ मध्ये राजकीय स्थैर्य आणण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पक्षांतर कायदा आणला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कायद्याचा गैरवापर करून शिवसेना फोडली. यात तत्कालिन राज्यपालांचा सुध्दा सहभाग आहे, हे लज्जास्पद आहे. आता त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. Asim Sarode
शिवसेना पक्ष फुटीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला. सभापती राहुल नार्वेकर या प्रकरणात जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळापत्रक बदलण्याबाबत सुचित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याच विधानसभा अध्यक्षाला अशाप्रकारे सुचना दिल्या नव्हत्या. शिवसेनेच्या या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाला अध्यक्षांना सुचना द्याव्या लागल्या, ही महाराष्ट्राची मानहानी आहे.
यावेळी अॅड. निढाळकर, सिने अभिनेते नंदु पाटील यांनीही आपले विचार मांडले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट, अमरसेन सावंत, महेश परुळेकर, संतोष शिरसाट, संदिप मांजरेकर, भास्कर परब, बबन बोबाटे, अतुल बंगे, शिवाजी घोगळे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अॅड. वरक यांनी प्रास्ताविक केले. महेश परूळकेर यांनी आभार मानले.
हेही वाचा