सोलापूर : चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्‍या कारखान्यातून कोट्यवधींचे एमडी ड्रग्‍ज जप्त | पुढारी

सोलापूर : चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्‍या कारखान्यातून कोट्यवधींचे एमडी ड्रग्‍ज जप्त

सोलापूर : अमोल व्यवहारे मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या कारखान्यामध्ये नाशिक पोलिसांनी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले. ही कारवाई (शुक्रवार) नाशिक पोलिसांच्या तीन पथकांकडून करण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती नाशिक पोलिसांकडून आज (शनिवार) देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील बंद पडलेल्या एका कारखान्यातून नाशिक पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये मोहोळ तालुक्यातील चिंचोली आणि चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत मुंबई, सोलापूर ग्रामीण आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या या ड्रग्स कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती मधून बंद पडलेल्या कारखान्यांच्या तपासणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसातील सलग तिसऱ्या कारवाईमुळे सोलापूर मधील बंद पडलेल्या औद्योगिक कारखाने हे ड्रग्स बनविण्याचे कारखाने झाले आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई शहर गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या पथकाने सोलापुरातील बाळे परिसरात राहणाऱ्या राहुल किशन गवळी आणि अतुल किशन गवळी या दोघा सख्या भावांना खार परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून 16 कोटी रुपयांचे आठ किलो एमडी ड्रग्‍सचा साठा जप्त केला होता. त्यांच्या चौकशीमध्ये निघालेल्या माहितीवरून, मुंबई शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी मधील बंद पडलेल्या कारखान्यातून जो की गवळी बंधूंचा एमडी ड्रग्स बनविण्याचा अड्डा आहे. तेथून कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स बनविण्याच्या कच्च्या मालाचा साठा जप्त केला होता. या कारवाईमध्ये मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, या ड्रग्स कारखान्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या कैलास सिंहजी वनमाळी या मुख्य सूत्रधारास हैदराबाद येथून अटक केली आहे.

तर दुसऱ्या कारवाईत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी देखील एमडी ड्रग्स विकायला देवडी पाटीजवळ थांबलेल्या दत्तात्रय लक्ष्मण घोडके व गणेश उत्तम घोडके या औंढी येथे राहणाऱ्या चुलत भावांना अटक करून त्यांच्याकडून सहा कोटी रुपयांचे तीन किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहेत. या दोघांकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील एका बंद पडलेल्या कारखान्यातून ग्रामीण पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा कच्च्या मालाचा साठा जप्त केला आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये ड्रग्स तयार करण्यासाठी मदत करणारा कामगार छोटू उर्फ चंद्रभान कोल (वय 25, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) यास प्रयागराज येथून अटक केली, असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यामध्ये हा कारखाना देखील गवळी बंधूंचाच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, गवळी बंधूंना तसेच मुंबई गुन्हे शाखेने पकडलेल्या कैलास वनसाळी यास देखील ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

तिसऱ्या कारवाईमध्ये नाशिक पोलिसांनी नाशिकमध्ये पकडलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून शुक्रवारी चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील श्री स्वामी समर्थ कंपनी या कारखान्याची तपासणी केली. त्या ठिकाणाहून कोट्यवधी रुपयांचे तीन किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ही कारवाई शुक्रवारी नाशिक पोलिसांनी केली. याबाबतची अधिकृत माहिती नाशिक पोलीस आज (शनिवार) देण्याची शक्यता आहे. या कारखान्यातून किती कच्चामाल मिळाला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा :

Back to top button