

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
गौडगाव (ता. बार्शी) हद्दीत एका ़इनोव्हा कारमध्ये वाहतूक केला जाणारा 62 किलो गांजा जप्त केला. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे. मागील सीटवर दोन पांढर्या रंगाच्या पोत्यामध्ये 62 किलो 135 ग्रॅम गांजा, सहा मोबाईल, इनोव्हा कार असा 30 लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला.
देशाच्या पूर्व व दक्षिण भागातील राज्यातून प्रतिबंधीत गांजाची छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मिळाली. त्यावरून त्यांनी तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदारांची बैठक घेऊन कारवाईचे आदेश दिले. 16 सप्टेंबरला विजयकुमार भरले यांना वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तुळजापूर व बार्शी रोडने इनोव्हा कारमधून गांजा वाहतूक होत असल्याची
माहिती मिळाली. पथकाने साफळा रचला. गौडगाव शिवारात त्यांना इनोव्हा कार दिसली. गाडीच्या मागील सीटवर दोन पांढर्या रंगाच्या पोत्यामध्ये 62 किलो 135 ग्रॅम गांजा, सहा मोबाईल, इनोव्हा कार असा 30 लाख चार हजारांचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. मुद्देमालचा पंचनामा करून वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चारही आरोपींना 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, विजय शिंदे, राजेश गायकवाड, श्रीकांत गायकवाड, सहा फौजदार निलकंठ जाधवर, विजयकुमार भरले, सलीम बागवान, हरिदास पांढरे, जयवंत सादुल यांनी पार पाडली.