

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर 11 दिवसांनी मंगळवारी सोलापूर शहरातील 1350 विविध मध्यवर्ती मंडळांकडून लाडक्या बाप्पाला वाजत गाजत, पारंपरिक लेझीम, झांज, ढोल वाजवून व डॉल्बीच्या तालावर थिरकून निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. शहरातील विविध नऊ मध्यवर्ती मंडळांकडून तयारी झाली आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 11.30 ते रात्री उशिरापर्यंत मिरवणुका चालणार आहेत. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापुरात तगडा बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
सोलापूरसह विविध तालुक्याच्या ठिकाणी लाडक्या बाप्पाचे अनंत चुतर्थी दिवशी आगमन झाले होते. मोठ्या उत्साहात लेझीम खेळत, गणपती बाप्पा मोरया, आला रे आले गणपती आला अशा जयघोष करीत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महापालिकेच्या वतीने विसर्जनासाठी छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव), श्री सिध्देश्वर मंदिर, गणपती घाट, कल्याणी कुंड, म्हाडा विहीर विडी घरकुल, एमआयडीसी ओपन स्पेस प्रिसिजन फॅक्ट्रीजवळ कुत्रिम कुंड, रामलिंग नगर विहीर, विष्णू मिल विहीर, बसवेश्वर नगर विहीर, मार्कंडेय उद्यान विहीर, सुभाष उद्यान विहीर यांच्यासह विविध ठिकाणी श्री गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मिरवणुकीत कोणताही गोंधळ होवू नये म्हणून वाहतूक शाखेकडून वाहतुकीचा मार्ग बदलला आहे. दुचाकी, चारचाकी, तीनचाकी वाहनांना पर्यायी मार्ग दिला असून जड वाहनास वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. ही मिरवणुक सकाळी 11.30 ते रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत चालणार आहे.
सोलापूर शहरात एकूण 9 मध्यवर्ती मंडळे असून, लेझीम, झांज यासह विविध पारंपरिक खेळांचे प्रदर्शन करत बाप्पांची मिरवणूक काढत असतात. यामध्ये लोकमान्य मध्यवर्ती, पूर्व विभाग मध्यवर्ती, विजापूर रोड मध्यवर्ती, लष्कर मध्यवर्ती, विडी घरकुल, होटगी मध्यवर्ती मंडळ, सार्वजनिक मध्यवर्ती गणेश मंडळ, नीलमनगर, बाळे मध्यवर्ती मंडळ या 9 मंडळाकडून जंगी मिरवणूक काढून लाडक्या बाप्पांना निरोप देणार आहेत.