गणपतराव देशमुख यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न परखडपणे मांडले : शरद पवार | पुढारी

गणपतराव देशमुख यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न परखडपणे मांडले : शरद पवार

सांगोला: पुढारी वृत्तसेवा: स्वच्छ चारित्र, एकनिष्ठता या विचाराने स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख प्रेरीत होते. शेतकरी, कामगार यांचे प्रश्न सोडवण्याची तळमळ त्यांची होती. त्यांचे कार्य वाखाण्याजोगे होते. सांगोला मतदारसंघातील जनतेने आतापर्यंत शेकाप व काँग्रेसला साथ दिली आहे. दुसऱ्या कोणत्याही पक्षाला येथील जनता स्वीकारत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी आज (दि.१३) येथे केले.

सांगोला येथे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रतनबाई देशमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, १९६२ पासून दोन वेळचा अपवाद वगळता गणपतराव देशमुख यांना येथील जनतेने निवडून दिले. रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जादा आमदार होते. त्यांनी गणपतराव देशमुख यांना मंत्री करा, असा आग्रह धरल्याने मी त्यांना माझ्या मंत्रिमंडळात मंत्री केले होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, गणपतराव देशमुख पुरोगामी विचारांवर अखेरपर्यंत ठाम राहिले. वंचितांसाठी लढण्याचा त्यांचा बाणा कायम प्रेरणा देणारा होता. कुठलेही विधेयक चर्चेविना मंजूर होऊ नये, यासाठी ते कायम आग्रही होते. शेतकरी, वंचित घटकांबाबत त्यांच्या शब्दाला धार यायची. आम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचो. गणपतराव देशमुख बोलायला उठायचे, तेव्हा ते म्हणायचे, तुम्ही विदर्भाचे प्रश्न मांडता. पण, तुमचं आाणि आमचं दुखणं सारखंच आहे. एकदा राज्याच्या दुष्काळी भागात फिरा, म्हणजे हे दुखणं काय आहे, ते तुम्हाला कळेल.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, खासदार संजय पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, माजी आमदार दीपक साळुंखे- पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार -सावंत, डॉ. अनिकेत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा 

Back to top button