सोलापूर : पटवर्धन कुरोलीत खून; भर दिवसा बोलेरो गाडी अंगावर घालून चिरडले | पुढारी

सोलापूर : पटवर्धन कुरोलीत खून; भर दिवसा बोलेरो गाडी अंगावर घालून चिरडले

पटवर्धन कुरोली, पुढारी वृत्तसेवा : पटवर्धन कुरोली येथे मागील भांडणाचा राग मनात धरून बोलेरो जीप अंगावर घालून चिरडून ठार मारले. ही घटना गुरुवारी (दि.१०) सकाळी घडली. देविदास दिगंबर नाईकनवरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्याच नात्यातील दोन आरोपींविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पांडुरंग नाईकनवरे ( वय ४७ वर्ष, रा. पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर) यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, देविदास नाईकनवरे याची भाची प्रियंका पवार हिचा विवाह सिध्देश्वर नाईकनवरे (रा. पटवर्धन कुरोली ) याच्यासोबत सात वर्षा पूर्वी झालेला होता. प्रियंका हिला रानातले काम जमत नसल्याने तिचे सासु-सासरे व पती हे तिला नेहमी शिवीगाळ करीत, वेळ प्रसंगी मारहाणही करत असत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांकाला तिचे सासु, सासरे व पती यांनी खूप मारहाण केल्याने तिला देविदास याच्या घरी आणले होते. त्यानंतर देविदास व चुलत भाऊ सचिन औदुंबर नाईकनवरे यांनी प्रियंकाच्या सासरी जावून प्रियंकाला का मारहाण केली. याचा जाब विचारत सासरा ब्रम्हदेव व प्रियांकाचा नवरा सिध्देश्वर यांचे सोबत वाद झाला होता.

देविदास नाईकनवरे हे दुचाकीवरून त्यांच्या घराकडे निघाले असताना ब्रम्हदेव नाईकनवरे यांने त्याच्या बोलेरो गाडीने पाठीमागून वेगाने येऊन देविदास यांच्या दुचाकीला धडक दिली. शिवाय, शंभर ते दोनशे फूट फरफटत नेले. गाडी पन्हा वळवून आणत देवीदासच्या अंगावर घातली. जखमी अवस्थेत देवीदास नाईकनवरे यांना चारचाकी कारगाडीमध्ये टाकून पंढरपूर येथिल खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचलंत का?

Back to top button