पंढरपूर : ३ कोटी ९३ लाखांच्या अपहार प्रकरणी संकल्प संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल | पुढारी

पंढरपूर : ३ कोटी ९३ लाखांच्या अपहार प्रकरणी संकल्प संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील संकल्प पतसंस्थेत ठेवीदारांनी ठेवलेल्या ३ कोटी ९३ लाखाची आर्थिक अफरातफर करण्यात आली आहे. याप्रकरणी संकल्प पथसंस्थेचे चेअरमन प्रथमेश कट्टे, संचालक, मॅनेजर यांचेविरूध्द पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, सहकारी संस्था (पणन) सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी कारवाईअंती संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंढरपूर संस्थेचे मुख्य प्रवर्तक चेअरमन प्रथमेश सुरेश कट्टे , संस्थेचे संचालक, सेक्रेटरी, मॅनेजर अविनाश दत्तात्रय ठोंबरे यांनी संगनमताने कागदपत्रांचे बनावटीकरण करून ठेवीदारांची फसवणूक केली. एकूण रक्कम ३ कोटी ९३ लाख ७७ हजारांचा अपहार केल्याचे वैधानिक तपासणीमध्ये निर्दशनास आले आहे. यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कपिल सोनकांबळे यांनी केली.

हेही वाचा : 

Back to top button