सोलापूर: करमाळा येथे एटीएम फोडणाऱ्या परप्रांतियांना सात दिवसांची कोठडी | पुढारी

सोलापूर: करमाळा येथे एटीएम फोडणाऱ्या परप्रांतियांना सात दिवसांची कोठडी

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : करमाळा शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम कापून 13 लाख 64 हजार रुपये लांबवणा-या हरियाणातील तिघा संशयित आरोपींना करमाळा न्यायालयाने सात दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सैफुलदुल्ली खान (वय 37), निसियुम नियाजअहमद (वय 24), हसन रहमत (वय 53, सर्व रा. हरियाणा) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या संशयितांची नावे आहेत.

विटा जिल्हा सांगली येथील पोलिसांनी सापळा रचून टेम्पोसह व साहित्यसह हे संशयित आरोपी 48 तासाच्या आत जेरबंद केले होते. व त्यांना करमाळा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, या चोराच्या मागावर करमाळ्याचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुजंवटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथक तपास करत होते. मात्र, विटा पोलिसांनी संशयास्पद स्थितीत तिघांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपींना करमाळा पोलिसांनी करमाळा न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. के. भोसले यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. या संशयित आरोपींना सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. सदरचे संशयित आरोपी हे हरियाणा राज्यातील असून त्यांनी अनेक ठिकाणी एटीएम फोडून लाखो रुपये लांबवल्याची शक्यता आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करणे, तसेच चोरीतील रक्कम हस्तगत करणे गरजेचे आहे. या एटीएम फोडून केलेल्या चोरीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button