उ. भारतावर संकटाचे 'ढग' : मुसळधार पावसाने आतापर्यंत घेतले ७६ बळी | पुढारी

उ. भारतावर संकटाचे 'ढग' : मुसळधार पावसाने आतापर्यंत घेतले ७६ बळी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्‍ली, जम्‍मू-काश्‍मीर, उत्तर प्रदेश आणि पंजाब राज्‍यांना मागील सहा दिवस पावसाने झोडपून काढले आहे. मागील २४ तासांमध्‍ये हिमाचल प्रदेशमध्‍ये ३९ ठिकाणी दरडी कोसळल्‍या. या राज्‍यांमधील मागील ७२ तासांमध्‍ये मृतांची संख्‍या ७६ झाली आहे. दरम्‍यान ,हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ( North India Rain Updates )

अतिवृष्‍टीमुळे उत्तर भारतातील राज्‍यांमध्‍ये हाहाकार माजला आहे. मृतांचा आकडा राज्‍यनिहाय पुढील प्रमाणे : उत्तर प्रदेशमध्‍ये ३४, हिमाचल प्रदेश २०, जम्‍मू-काश्‍मीर १५, दिल्‍ली ५ तर राजस्‍थान आणि हरिणायात प्रत्‍येकी एकाचा मृत्‍यू झाला आहे. दरम्‍यान, उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्‍ये मध्‍य प्रदेशच्‍या पर्यटकांच्‍या बसवर दरड कोसळली. या दुर्घटनेत इंदौर येथील चार पर्यटकांचा मृत्‍यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे दिल्‍लीमध्‍ये यमुना नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. आज (दि.११ जुलै) सकाळी ८ वाजता यमुना नदीच्‍या पाणी पातळी २०६.३२ मीटर एवढी होती. १९७८ मध्‍ये ही यमुना नदीच्‍या पाणी पातळी सर्वोच्‍च म्‍हणजे २०७.४९ मीटर इतकी होती. जवळजवळ संपूर्ण उत्तर भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना, लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने प्रभावित राज्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य मोहित तीव्र केली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button