सोलापूर : करमाळ्यात चारधाम यात्रेच्या अमिषातून ४७ भाविकांना १२ लाखांचा गंडा | पुढारी

सोलापूर : करमाळ्यात चारधाम यात्रेच्या अमिषातून ४७ भाविकांना १२ लाखांचा गंडा

करमाळा; पुढारी वृत्तसेवा : चारधाम यात्रा घडवून आणतो, म्हणून पुणे येथील एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या आयोजकांनी करमाळा येथील ४७ भाविकांना तब्बल १२ लाखाचा गंडा घातल्याची आरोप ट्रॅव्हल कंपनीवर करण्यात आला आहे. संबधित संशयितां विरोधात करमाळा पोलिसात तक्रार देण्यात आली असून अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, करमाळा येथील काही भाविकांनी चारधाम यात्रा करण्याचे नियोजन केले होते. यामध्ये तब्बल ४७ भाविकांनी पुणे येथील ड्रीम कस्टर टूर्स ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्स कंपनीच्या फेसबुकवरील माहितीवरुन सहलीचे नियोजन केले. यामध्ये ट्रॅव्हल कंपनीचे संचालक संकेत भंडाळे, ऋषिकेश भंडाळे, सुप्रिया भंडाळे (सर्व रा. धायरी, जि. पुणे) व बालाजी सूर्यवंशी (रा. वडगाव बु. तालुका हवेली जि. पुणे) याच्यांशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क केला. या आयोजकांनी प्रत्येकी २५ हजार रुपये प्रवास खर्च सांगून पुणे ते चारीधाम ठिकाणी यात्रा करण्याचे ठरवले होते. यामध्ये दहा दिवस व अकरा रात्री असा प्रवास निश्चित करून प्रवासातील सर्व खर्च ट्रॅव्हल  कंपनीने करण्याचे ठरले होते.

यामध्ये पुणे ते दिल्ली असा विमानाने प्रवास करण्याचे ठरले होते. हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ असा प्रवास ठरलेला होता. याबाबत ४७ भाविकांनी ११ लाख ७५ हजार रुपये या कंपनीकडे भरले होते. त्यानंतर संशयितांनी खराब हवामानासह विविध कारणे भाविकांना देऊन ही यात्रा रद्द केली. त्यानंतर ७ मे २०२३ रोजी १५ दिवसात तुमचे पैसे माघारी देतो, असे सांगितले होते. सर्वांचा विश्वास संपादन केला होता. मात्र त्यांना पैसे परत दिले नाहीत.

या आयोजकांनी ४ मे ते १५ मे दरम्यान आयोजित चारधाम यात्रा घडवली नाही. याबाबत ट्रॅव्हल कंपनीच्या आयोजकांना विचारले असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही तुमचे पैसे माघारी देऊ शकत नाही अशी उत्तरे दिली. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच भाविकांनी करमाळा पोलिसांत धाव घेतली. मात्र अद्यापही याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

हेही वाचा 

Back to top button