सोलापूर जिल्हा पर्यटनक्षेत्र म्हणून जाहीर करणार : मंगलप्रभात लोढा यांची घोषणा | पुढारी

सोलापूर जिल्हा पर्यटनक्षेत्र म्हणून जाहीर करणार : मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावा, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक आमदार आणि खासदारांनी केली होती. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन सोलापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावा, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवू , अशी ग्वाही राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास आणि महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

लोढा यांच्या हस्ते आज सकाळी ९ वाजता सोलापुरातील केटरिंग महाविद्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी खा. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक भगवंत पाटील, निशीथ श्रीवास्तव, चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याती अक्कलकोटचे स्वामी महाराज, पंढरपूर येथील पांडुरंग, जवळच असलेले गाणगापूर येथील श्री दत्त, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर आणि बार्शी येथील भगवंत मंदिर अशी अनेक नावाजलेली आणि प्रसिध्द असलेली तीर्थस्थळे आहेत. त्यामुळे हा जिल्हा पर्यटन आणि तीर्थ क्षेत्राचा जिल्हा म्हणून घोषित करावा, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली.

त्यानंतर या मागणीला खासदार जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी दुजोरा दिला. त्यामुळे पर्यटन मंत्री लोढा यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सोलापूर जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची घोषणा केली. तर सोलापूर येथील उद्घाटन केलेल्या केटरिंग महाविद्यालयाला श्री स्वामी समर्थांचे नाव द्यावे, अशी मागणी यावेळी अनेकांनी केली होती. त्या मागणीचा ही सकारात्मक विचार करत मंत्री लोढा यांनी श्री स्वामी समर्थ केटरिंग महाविद्यालय असे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सीईओ दिलीप स्वामी, माजी सभापती विजयराज डोंगरे, संजय कोळी, राजकुमार पाटील, दीपक गवळी आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button