आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी | पुढारी

आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर आषाढीवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात दि. २० जून ते दि. ४ जुलै या कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर व पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी याबाबत अधिसूचना निर्गमित केली आहे.

अधिसूचनेत म्हटले आहे, जिल्ह्यात महत्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून, वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी आलेल्या सुचनेनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायामध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असते. आषाढी वारीच्या २० जून ते दि. ४ जुलै या कालावधीत मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत लाखो भाविक व वारकरी येत असतात. दि. २८ जून रोजी पंढरपूर येथे सर्व पालख्या एकत्र येतात. लाखो भाविक मंदिर तसेच मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकवटलेले असतात. या ठिकाणी विशेषतः वेगवेगळ्या नदी घाटावर जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व पालखी मार्गावर बरेच टी.व्ही. चॅनल्स, खासगी व्यक्ती संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. तेव्हा यावेळी दहशतवाद्यांकडून कारवाया होऊ नये, याकरिता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहील, असेही आदेशात म्हटेले आहे.

हेही वाचा : 

Back to top button