अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमातील राजकारण थांबवा, अन्यथा..: गोपीचंद पडळकर | पुढारी

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमातील राजकारण थांबवा, अन्यथा..: गोपीचंद पडळकर

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा राजकारण करू नये, तुम्हाला अहिल्यादेवींची जयंती म्हणजे काय राजकारणाचा अड्डा वाटतो का ? जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण केल्यास त्याचा पश्चाताप आजोबांना व नातवाला होईल, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांच्यावर सोलापुरात केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे शनिवारी (दि.२७) एका कार्यक्रमानिमित्त सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली.

मागील वर्षी अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या वादाविषयी आमदार पडळकर यांना विचारल्यास ते म्हणाले, गेल्या वर्षी सत्तेचा गैरवापर करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातली फार मोठी चूक केली आहे आणि ती चूक परत आजोबांनी, नातवानी पुन्हा करू नये. जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण झालं अशी जर बातमी लागली तर याचा पश्चाताप आजोबांना व नातवाला होईल. महाराष्ट्रातील लोक त्यांना सुट्टी देणार नाहीत, अशी टीका पडळकर यांनी केली.

आमदार रोहित पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये दम आहे का ? शिवनेरीवरती जाऊन दुसरा मंडप लावायचा, रायगडावरती जाऊन दुसरा मंडप लावायचा दम आहे का? लोक ठोकून काढतील त्यांना माहित आहे, त्यांना इथं मऊ लागतंय म्हणून ते वाद उकरण्याचा प्रयत्न करत होते अशी टीका यावेळी पडळकर यांनी केली.

पडळकर पुढे म्हणाले, चौंडी येथे जयंतीचा कार्यक्रम किती वर्षापासून होतो. तुम्हाला काय राजकारणाचा सेंटर वाटतय का ? गेल्या अनेक वर्षांपासून तिथं प्रथा – परंपरा आहे. अण्णासाहेब डांगे साहेब, तुम्ही यायच्या नंतर महादेव जानकर यायचे, आता तिथं समाजाच्या वतीने जयंती होते. माझा सवाल आहे की, चार वेळा मुख्यमंत्री असताना शरदचंद्रजी पवार, केंद्रामध्ये अनेक वर्ष मंत्री असताना राज्यांमध्ये त्यांची अनेक वर्ष सत्ता असताना ते एकदाही चौंडी येथे जयंतीला आले नाहीत. गेल्या वर्षी जयंतीला काय यायचं कारण तुमच्या नातवाला लॉन्च करायचे ते ठिकाण आहे का? यामुळे पवारांना माझं सांगणं आहे तुम्ही यात नाक खूपसण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, नाहीतर याचे वाईट परिणाम होतील. जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी होतो तो अराजकीय होतो असा इशारा पडळकर यांनी दिला.

अधिक वाचा :

Back to top button