नाशिक: घोटीच्या ‘एपीआय’ची तातडीने बदली करा; आमदार फरांदे यांची ‘एसपीं’कडे मागणी | पुढारी

नाशिक: घोटीच्या 'एपीआय'ची तातडीने बदली करा; आमदार फरांदे यांची 'एसपीं'कडे मागणी

इगतपुरी: पुढारी वृत्तसेवा: खंबाळे हद्दीतील विश्रामगृहाशेजारील दगड खाणीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर अज्ञातांनी मद्यधुंद अवस्थेत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तोंडावर व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. ही घटना २१ मेरोजी घडली होती. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मृत महिलेच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांची तातडीने बदली करून सक्षम अधिकारी देण्याची मागणी आमदार फरांदे यांनी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे भ्रमणध्वनी करून केली. तसेच गटविकास अधिकारी लता गायकवाड यांच्याविषयी नाराजी व्यक्त करून त्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

मृत महिलेला एक मुलगा व एक मुलगी असून पती नेहमी आजारी असतात. त्यामुळे या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी कुटुंबातील सदस्य व नागरिकांनी केली. तर या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी केली.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव, खंबाळेचे उपसरपंच दिलीप चौधरी, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, माजी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब डोगरे, किरण फलटणकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश चांदवडकर, तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे, भाजप महिला आघाडीच्या वैशाली आडके, घोटी ग्राम पालिकेच्या सदस्या वैशाली गोसावी, स्वाती भामरे, रोहिणी नायडू, शुभा कदम, पल्लवी शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button