सोलापूर : शेतीपंपाच्या विजेचा लपंडाव?
केत्तूर ता.करमाळा; पुढारी वृत्तसेवा पश्चिम महाराष्ट्रात विशेषता सातारा, सांगली, पुणे, सोलापूर या जिल्हामध्ये शेती पंपासाठी ८ तास वीज पुरवठा केला जातो. तो ही आठ दिवस रात्री आणि दिवसा. विविध संघटनाची दिवसा ८ तास विजेची मागणी असताना ही मागणी पूर्ण करण्यात सरकारला अपयश येताना दिसत आहे.
रात्रीच्यावेळी रानटी जनावरे व सर्प दंशाच्या विविध घटना करमाळा तालुका व परिसरात वारंवार घडत आहेत. म्हणुन शेतकरी रात्रीच्या वेळीच शेती पंप बंद ठेवण्यात पसंती देत आहेत. परंतु दिवसा ८ तास वीज पुरवठा चालु असताना कमीत – कमी ३ ते ४ वेळा वीज जाते व येते. या विजेच्या लपंडावामुळे वीजपंप नादुरुस्त होणे, वीज वाहक केबल जळणे, पाईप लाईन गळती होणे या समस्या जाणवत आहेत.
त्यातच उन्हाचा जोर हा वरचेवर वाढतानाच दिसत आहे. यामुळे उजनी काठच्या ऊस व केळी पिकाचे पाण्याअभावी खुप मोठे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळत आहे. रोहिणी नक्षत्रास सुरुवात झालेली असली तरी मान्सूनपूर्व पावसाचाही अजुन चिन्हे नाहीत. आमच्या कडून जबरदस्ती विज बिल वसुली करता तर आम्हाला पुर्ण उच्च दाबाने व अखंडित ८ तास वीजपुरवठा द्या अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.
आम्ही कृषी पंपाचे लाईट बिल वेळोवेळी भरत असून, सारखी लाईट ये-जा करत असते. त्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. तीव्र उन्हाळा आणि त्यात जोरदार वारे वाहू लागल्याने पिके कोमेजून जाऊ लागली आहेत. रामचंद्र कोकणे-चेअरमन केत्तूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी.
हेही वाचा :

