सोलापूर: घरकुल बांधकाम आवास सप्ताहात ५२ लाभार्थ्यांना हक्काचे घर : बीडीओ मनोज राऊत | पुढारी

सोलापूर: घरकुल बांधकाम आवास सप्ताहात ५२ लाभार्थ्यांना हक्काचे घर : बीडीओ मनोज राऊत

जेऊर : पुढारी वृत्तसेवा: पंचायत समिती करमाळा अंतर्गत दि. २२ ते ३० मार्च (गुढीपाडवा ते रामनवमी) अखेर घरकुल बांधकाम आवास सप्ताहात घरकुल लाभार्थ्यांनी स्वतःच्या हक्काच्या घरावर गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला असल्याची माहिती करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली. राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आवास अभियान कालावधीमध्ये ६२ घरकुलांचे करारनामे या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत.

पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत जिंती येथील अनुसूचित जमातीचे दोन लाभार्थी, शेलगाव येथील अनुसूचित जातीचे दोन लाभार्थी, पोथरे येथील भटक्या जमाती-एक लाभार्थी असे एकूण पाच घरकुल लाभार्थ्यांनी जागा खरेदी केली आहे. त्यांचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केलेले होते. या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळालेली असून सदर लाभार्थ्यांना शासन नियमानुसार गावाच्या रेडीरेकनर दरानुसार अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आलेले आहे.

त्याचबरोबर आवास सप्ताह कालावधीत ३६ घरकुल लाभार्थींना पहिला हप्ता रक्कम रुपये ५ लाख ४० हजार, ७९ लाभार्थींना दुसरा हप्ता रक्कम रुपये ४७ लाख ८० हजार, ५५ लाभार्थींना तिसरा हप्ता रक्कम रुपये २१ लाख ७० हजार, तर १५ लाभार्थींना चौथा हप्ता रक्कम रुपये २ लाख ८० हजार असे एकूण रक्कम रुपये ७७ लाख ७० हजार इतके अनुदान गुढीपाडवा ते रामनवमी अखेर घरकुल लाभार्थींच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. तसेच आवास सप्ताहामध्ये ५२ घरकुल लाभार्थींना हक्काचे घर मिळालेले असल्याची माहिती गटविकास अधिकारी राऊत यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button