सोलापूरात अवकाळीच्या फटक्यानंतर तापमानात पुन्हा वाढ | पुढारी

सोलापूरात अवकाळीच्या फटक्यानंतर तापमानात पुन्हा वाढ

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : बदलत्या निसर्ग चक्राचा फटका सोलापूरला बसत आहे. यंदा फेब्रुवारीच्या मध्यावधीपासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 17 मार्चला अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात घट झाली. पण त्यानंतर पुन्हा सोलापूर तापत असून बुधवारी तापमान 39.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने सोलापूरकर चक्‍क घामेघूम झाले.

सोलापूरच्या तापमान वाढीला अनेक कारणांचा अंदाज बांधला जात आहे. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याने तापमानात वाढ होत असल्याचे कारण नक्कीच पुढे येणार आहे. यंदा तापमान झपाट्याने वाढत असल्याने नागरिक घामेघूम होत आहेत. अशात 17 मार्चला झालेल्या पावसामुळे 37.4 अंश सेल्सिअसवर गेलेले तापमान 33 अंशावर आले. त्यानंतर सतत चार ते पाच दिवस 33 अंशादरम्यान तापमान होते.

24 मार्चनंतर पुन्हा यात वाढ होत असल्याने उकाड्यापासून सुटक्यासाठी पंख्यांचा निभाव लागत नसल्याने नागरिकांना कुलर आणि एसीचा आधार घ्यावा लागत आहे. शासकीय कार्यालय परिसरासह अन्यत्र पार्किंगमध्येही एससी चालू करुनच गाडीत बसत आहेत. इतका उकाडा सध्या जाणवत आहे. 17 मार्चला 0.8 मिलि, 17 मार्चला 1.6 मिलि , 19 मार्चला 1.6 मिलि इतका पाऊस झाला. यामुळे थोडा वातावरणात गारवा निर्माण झाला होता. आता पुन्हा सूर्यदेव आग ओकत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

तापमानावर एक नजर… (अंश सेल्सिअसमध्ये)

24 मार्च 37.6
25 मार्च 37.8
26 मार्च 37
27 मार्च 37
28 मार्च 38.7
29 मार्च 39.4

Back to top button