

करमाळा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील झरे गावचे रहिवासी नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बापुराव बागल (वय ३९) यांचे ग्वाल्हेर युनिट ८ ( झांसी) येथे बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे माहिती समजताच गावावर शोककळा पसरली.
लष्करी अधिकाऱ्यांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांचे लहान बंधू नायब सुभेदार भूषण उर्फ ब्रम्हदेव बापुराव बागल हे पंजाब येथील पाटियाला येथे लष्करात अधिकारी आहेत. त्यांना याची माहिती देऊन त्यांच्या उपस्थितीत सर्व शासकीय कर्तव्य पार पाडून ज्ञानेश्वर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी झरे येथे मोटारीने आणण्यात येत आहे. त्यांच्यावर शुक्रवारी (दि.३१) रोजी झरे येथे बागल वस्तीवर शासकीय इतमामात अंतिम संस्कार होणार आहे.
नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल हे २००३ साली भारतीय सेनेत भरती झाले होते. ते ग्वाल्हेर युनिट ८ या ठिकाणी सेवेत असताना त्यांना कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचे निधन झाले.
नाईक सुभेदार ज्ञानेश्वर बागल यांचा जन्म १९८४ साली झाला. त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण झरे गावात झाले असून महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले आहे. त्यानंतर २००३ साली ते भारतीय सेनेत शिपाई पदावर भरती झाले. त्यांनी पुढे शिक्षण घेऊन पदोन्नती मिळून ते सुभेदार नाईक पदापर्यंत गेले होते. गायन सम्राट बापुराव बागल यांचे ते चिंरजीव होत. त्यांच्या पश्चात वडील बापुराव हरिभाऊ बागल, आई शांताबाई बापूराव बागल, भाऊ भूषण उर्फ ब्रम्हदेव बापूराव बागल ( मेजर ), पत्नी – कांचन ज्ञानेश्वर बागल , मुलगा विवेक व मुलगी अंजली, बहिण मुक्ताबाई गुळवे असा मोठा परिवार आहे.
या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बागलवस्ती येथे चौथरा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अहमदनगर येथील लष्करी सैन्यदलातील पथक व करमाळा पोलीस ठाण्यातील पोलिसांचे पथक अखेरची मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. अशी माहिती बागल यांचे चुलत बंधू सिद्धनाथ व अमोल बागल यांनी सांगितले.
हेही वाचा :