नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर | पुढारी

नाशिक, अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्प वनविभागाच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी आणि पांझण येथील तब्बल ४०० एकर वनजमिनीवर बेकायदेशीररीत्या उभारलेला सौरऊर्जा प्रकल्प सील केल्यानंतर वन दक्षता पथकाने नाशिक वनवृत्तातील इतर सौरऊर्जा प्रकल्पांकडे मोर्चा वळविला आहे. महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी अर्थात ‘महाजेनको’कडून मिळालेल्या यादीनुसार नाशिक आणि अ. नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्पांची तपासणी दक्षता पथक करणार आहे. त्यामुळे वनजमिनींवर बेकायदा असलेल्या प्रकल्प चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी व पांझण येथील वनजमिनीवर बेकायदा उभारण्यात आलेला सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प सील करण्यासाठी मंगळवारी (दि.२७) वन दक्षता पथक आणि प्रादेशिक विभागाने संयुक्तरीत्या ‘ऑपरेशन सोलर’ राबविली होते. या कारवाईत प्रकल्पाचे सर्व साहित्य व ट्रान्समिशन यंत्रणा जप्त करून त्याच्या पावतीद्वारे सर्व साहित्य संबंधित कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. तसेच वीज विक्रीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांमार्फत महावितरणला पत्र देण्यात आले आहे. या प्रकरणानंतर दक्षता पथकाकडून पश्चिम वन विभागासह पूर्व वन विभागातही वनजमिनीच्या नोंदीसह अतिक्रमणाचे खोदकाम सुरू केले आहे.

दक्षता विभागाने नाशिक व अ.नगर जिल्हाभरातील वनजमिनींवरील अतिक्रमित सौरऊर्जा प्रकल्प शोधमोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी ‘महाजेनको’ला पत्रव्यवहार केला असून, संकलित माहितीअंती वनजमिनींची तपासणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीसह कागदपत्रांची ‘दक्षता’कडून पडताळणी केली जाणार आहे. वनजमिनीवर अतिक्रमण असल्याचे सिध्द झाल्यास संबंधित कंपनीविरोधात कारवाईचा इशारा वनविभागाने दिला आहे. या मोहिमेमुळे अनेक प्रकल्पांसह वनजमिनीवर असलेल्या आस्थापनांचे धाबे दणाणले आहे.

वनजमिनींची परस्परविक्री तसेच अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘महाजेनको’कडे नाशिक आणि अ.नगर जिल्ह्यातील सौरऊर्जा प्रकल्पांच्या यादीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या प्रकल्पांची तपासणी केली जाणार आहे. वनजमिनींवर अतिक्रमण आढळल्यास संबंधित कंपनीविरोधात कठाेर कारवाई करण्यात येईल.

-विशाल माळी, उपविभागीय वनाधिकारी, वन दक्षता पथक, नाशिक

बैसाणेतील प्रकल्पावर टांगती तलवार
ताहाराबाद येथील बैसाणेतील ५५ एकर वनजमिनीची परस्परविक्री केल्याचा प्रकार दक्षता विभागाने उघडकीस आणला होता. या वनजमिनीवर बेकायदा १० मेगावाॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारल्याप्रकरणी दिल्लीस्थित कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. कंपनीकडून सबळ पुरावे प्राप्त न झाल्याने प्रकल्प सील करण्याची तयारी दक्षता पथकाने सुरू केली आहे.
—- —– —– —— —-

हेही वाचा : 

Back to top button