सोलापूर : वळसंग पोलिसांची कामगिरी सुसाट; २०२ जणांना अटक वॉरंट | पुढारी

सोलापूर : वळसंग पोलिसांची कामगिरी सुसाट; २०२ जणांना अटक वॉरंट

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याचे काम हाती घेऊन ते तडीस नेण्याची मोहीम सुरू केली आहे. यामुळे सराईत गुन्हेगार पोलिसांसमोर हजर होऊन शरण जात आहेत. न्यायालयात हजर न होता पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक वॉरंट बजावून त्यांना धडा शिकवण्यात येत आहे. या मोहिमेची कुणकुण लागताच सराईत गुन्हेगार पोलिसांसमोर हजर होऊन शरण जात आहेत.

बहुतांश गुन्हेगार कोर्टात हजर होऊन जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. अनिल सनगल्ले यांनी राबविलेल्या प्रलंबित गुन्हे निपटारा कामगिरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेमुळे लवकरच वळसंग पोलीस ठाणे व त्या अंतर्गत येणाऱ्या गोदुताई परुळेकर विडी घरकुल येथील पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या गुन्ह्यांची निर्गती होण्यास मदत होणार आहे.

सोलापूर-अक्कलकोट महामार्ग, तीन सिमेंट कारखाने, साखर कारखाने, अति संवेदनशील कुंभारी येथील गोधुताई परुळेकर विडी घरकुल, कुंभारी, दर्गनहळ्ळी, वळसंग या संवेदनशील ठिकाणांसह ३५ गावांच्या सुरक्षेचा डोलारा वळसंग पोलीस ठाणे सांभाळत आहे. सोलापूर- हैदराबाद आणि अक्कलकोट-सोलापूर दोन राष्ट्रीय महामार्गामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहेत. अपघातग्रस्तांना मदत करण्याबरोबरच विडी घरकुल येथील किरकोळ घटनेला लागणारा वेळ, यामुळे पोलिसांचा ताण वाढत आहे. या सगळ्या जबाबदारी पेलत आणि रोज घडणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हे निर्गतीची मोहीम जोरात सुरू आहे.

आतापर्यंत एका महिन्यात तपास करून 50 खटले न्यायालय दाखल केले आहेत. मृत्यू झालेल्या आठ घटनांचे तपास पूर्ण करण्यात अनिल सनगल्ले यांच्या पथकाला यश आले आहे. प्रलंबित 216 अटक वॉरंटपैकी 202 गुन्हेगारांना अटक वॉरंट बजावण्यात आली आहेत. त्यातील अनेकांना अटकही करण्यात आली आहे. एक महिन्याच्या कालावधीत नऊ जुगार अड्ड्यावर धाडी टाकून 10 हजार 574, तर 18 ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यावर धाडी टाकून 10 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

घरकुलमध्ये आरोपींना शोधणे कठीण

कुंभारी विडी घरकुलमध्ये आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना असंख्य अडथळ्यांच्या शर्थी पार कराव्या लागत आहेत. आज राहत असलेल्या घरात दुसऱ्या दिवशी आरोपी नसतो. त्याचे ठिकाण, खानाखुणाही बदललेले असतात. शहर जवळ असल्याने लपण्यासाठी त्यांना मोकळीकता मिळते. ही आव्हाने असतानाही त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहेत.

दैनंदिन कामकाजाबरोबरच अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करून धाडी टाकण्यात येत आहेत. हुल्लडबाजी करणारे व समाजकंटक आता रडारवर असतील.

– सपोनि अनिल सनगल्ले, प्रभारी अधिकारी वळसंग पोलीस ठाणे

पीडित, अन्यायग्रस्तांना दिलासा देण्याबरोबरच गुन्हेगारांना वळसंग पोलीस ठाणे कर्दनकाळ ठरले आहेत. कायदा मोडणाऱ्यांवर खाकीच्या धाकाचा वचक बसत आहे. यामुळे परिसर शांत आहे.

– ऋषिकेश उपासे, व्यावसायिक, कुंभारी

हेही वाचा 

Back to top button