सोलापूर : मराठी चित्रपटात भूमिका देण्याचे आमीष दाखवून दिग्दर्शकाचा तरूणीवर लैंगिक अत्याचार

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : चित्रपटात चांगली भूमिका देतो असे म्हणून २५ वर्षीय अभिनेत्रीला कार्यशाळेला बोलावून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून तिचे दिड लाख रूपये मानधन बुडवल्याचा प्रकार येडशी (जि. धाराशीव) येथील एका महाविद्यालयाच्या खोलीत घडला. संजय उत्तमराव पाटील (वय ५०, रा. गणराज कॉलनी, नागापुर एमआयडीसी अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दिग्दर्शकाचे नाव आहे. सोलापुर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २५ वर्षीय अभिनेत्रीने याबाबत फिर्याद दिली आहे.
सन 2019 मध्ये पिडीत अभिनेत्री ही मुंबई येथे चित्रपटात काम करण्यासाठी गेली. दरम्यान या तरुणीची पाटील नामक दिग्दर्शकाशी ओळख झाली. सन 2022 मध्ये दिग्दर्शक संजय पाटील यांच्या “भाऊचा धक्का या चित्रपटाकरीता सेकंड लिड भुमिकेसाठी पिडीतेची निवड करण्यात आली होती.
भाऊचा धक्का ह्या चित्रपटाचे शुटींगकरिता २०/०९/२०२२ रोजी पासुन ५ दिवस येडशी (धाराशिव) येथील एक कनिष्ठ महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित केली होती. पिडीतेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नियमानुसार ५,०००/- रुपये प्रतिदिन मानधन देण्याचे संजय पाटील यांनी कबुल केले होते. या कार्यशाळेत चित्रपटात काम करणारे इतर अभिनेता यांचे ऑडीशन तसेच लेखी करार इत्यादी कामे केली जाणार होती. त्यावेळेस ऑडिशनला आलेली मुले व मुली यांच्या खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था ही कार्यशाळेच्या ठिकाणीच होती.
दिनांक 20/09/2022 रोजी पीडितेला तेथे पोचण्यास उशिर झाला होता. रात्री ९ च्या सुमारास तेथे पोचल्यानंतर पाटील यांनी अभिनेत्रीला दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये भेटायला बोलावल्याचे सांगतिले. पीडित तरुणी तिथे गेल्यानंतर, ‘तु सगळ्यांवर विश्वास ठेवते. माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. भाऊचा धक्का या चित्रपटात तुला मी चांगला रोल देणार आहे आणि पैसे पण जास्त देईन पण तु हे कुणाला सांगू नकोस असे म्हणून तिच्यावर संमतीशिवाय जबरदस्तीने अत्याचार केला.
घडलेला सर्व प्रकराबाबत जर कोणाला सांगितले तर भाऊचा धक्का ह्या चित्रपटात मिळालेले काम जाईल ह्या भितीने फिर्यादी पीडित तरुणीने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. या घटनेचा अधिक तपास पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनी शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.