सोलापूर : सहा महिने उलटले; करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा | पुढारी

सोलापूर : सहा महिने उलटले; करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा

जेऊर; गणेश चव्हाण :  परतीच्या पावसाने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. सहा महिन्यांपूर्वी पंचनामे देखील झाले, मात्र आजही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम आहे. नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता संघटनादेखील रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी बळीराजा करत आहे.

दिवाळीपूर्वी परतीचा पाऊस झाला होता. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने तालुका स्तरावर दिले होते. पंचनामे झाले मात्र नुकसान भरपाई जमा झाली नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तेव्हा दिवाळी तोंडावर आली होती. त्यावेळी दिवाळी गोड करू, असे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. मात्र पंचनामे होऊन सहा महिने उलटली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली नाही. कांदा, ज्वारी, बाजरी, मका तसेच इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मोडून पडण्याची वेळ आली आहे. नुकसान भरपाई मिळाल्यावर एक आधार मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र प्रतीक्षा करूनही भरपाई मिळत नाही. यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.

परतीच्‍या पावसाने करमाळा तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रात नुकसान झाले आहे. तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात आले होते. झटपट झालेल्या पंचनाम्यांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळेल, अशी आशा होती. मात्र त्‍यांच्‍या पदरी प्रतीक्षाच आली. नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आता संघटनादेखील रस्त्यावर उतरू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी बळीराजा करत आहे.

सहा महिन्यांपूर्वी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी शासकीय अधिकारी करून गेले होते. तात्काळ मदत मिळेल, असे शासन स्तरावरून सांगितले जात होते. मात्र ६ महिने होऊन देखील शासनाने नुकसान भरपाई खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक उभे राहिले आहे. शासनाने गांभीर्य ओळखून नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी.
– विपुल गोरे (शेतकरी)

सहा महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी निधीची तरतूद देखील केली आहे. मात्र निधी मिळाला नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुढील ७ दिवसात जर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही तर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल.
– संदीप तळेकर (तालुकाप्रमुख प्रहार जनशक्ती संघटना)

हेही वाचा :

 

 

 

Back to top button