सोलापूर: २५ वाहनांची विक्री करणाऱ्यास अटक; १ कोटी २० लाखांची वाहने जप्त | पुढारी

सोलापूर: २५ वाहनांची विक्री करणाऱ्यास अटक; १ कोटी २० लाखांची वाहने जप्त

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : विश्वास संपादन करून फिरण्यासाठी वाहने घेऊन त्या वाहनांची परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीस सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोटी 20 लाख रुपयांची 25 वाहने जप्त केली. जप्त केलेल्या वाहनात आठ ट्रॅक्टर, 14 कार, तीन दुचाकी अशी वाहने आहेत. गणेश हिंदुराव माडकर (रा. हराळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे राहणारा गणेश माडकर हा सोलापूर येथे कामाला होता. तो गावी आल्यानंतर गावातील तसेच जवळपासच्या गावातील ज्या नागरिकांकडे चारचाकी वाहने आहेत. अशा लोकांना विश्वासात घेऊन मला फिरायला जाण्यासाठी गाडी पाहिजे, असे सांगून वाहन घेऊन ते परत न करता त्याचा अपहार करत होता. यामध्येच गणेश याने कोरवली येथील एका नागरिकास विश्वासात घेऊन त्याच्याकडील स्विफ्ट डिझायर कार 22 फेब्रुवारी 2023 रोजी घेऊन गेला होता. त्याने ती कार परत केली नव्हती. त्यामुळे कामती पोलीस ठाण्यात माडकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कामती पोलिसांनी गणेश माडकर याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने अशा प्रकारे क्रांती व इतर भागातील अनेकांना अशा प्रकारे फसवून बरीच वाहने परस्पर विकल्याची कबुली दिली. क्रांती पोलिसांनी गणेश माडकर यांच्याकडे अधिक तपास करून त्याच्याकडून आठ ट्रॅक्टर 14 जीप व कार तीन दुचाकी अशी एकूण 25 वाहन जप्त केली आहेत. तर गणेश माळकर यास न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, हवालदार बबन माने, यशवंत कोटमळे, अमोल नायकोडे, भरत चौधरी, जगन इंगळे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button