सोलापूर : फसवणूकप्रकरणी एविस कॉम्प्युटर्सवर गुन्हा दाखल | पुढारी

सोलापूर : फसवणूकप्रकरणी एविस कॉम्प्युटर्सवर गुन्हा दाखल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एकाच्या नावावर दुसर्‍यालाच परीक्षा द्यायला लावून मराठी टायपिंगचे एमकेसीलएलचे प्रमाणपत्र देणार्‍या एविस कॉम्प्युटर्सच्या मालक, व्यवस्थापकाविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालक अविनाश उत्तरेश्वर मठपती, व्यवस्थापिका श्रावणी पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते यांनी फिर्याद दाखल केली आहे. विजापूर रोडवरील एविस कॉम्प्युटर्स याठिकाणी जाऊन पोलिस उपनिरीक्षक ताकभाते यांनी मराठी प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यावेळी एविस कॉम्प्युटर्समधील प्रशासक म्हणून काम करणार्‍या श्रावणी पाटील यांनी ताकभाते यांना प्रमाणपत्रासाठी पैसे भरावे लागतील, असे सांगितले. त्यावेळी ताकभाते यांनी पैसे भरले. त्यानंतर त्यांनी ताकभाते यांच्या नावाचे एमकेसीएलचे (महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, पुणे) कॉम्प्युटर टायपिंग स्पिड टेस्ट मराठी 98 टक्के तंतोतपणा असलेले तसेच 37 शब्द प्रतिमिनिट या वेगाचे एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सहीचे व एमकेसीएलचा शिक्का असलेले प्रमाणपत्र दिले.

वास्तविक ताकभाते यांनी एमकेसीएलची प्रशिक्षण देणार्‍या एविस कॉम्प्युटर येथून कोणत्याही प्रकारचे मराठी टायपिंग परीक्षा दिलेली नाही. ताकभाते यांच्याऐवजी दुसर्‍यालाच परीक्षेला बसवून ताकभाते यांना मराठी टायपिंग कौशल्य असलेले प्रमाणपत्र देऊन एमकेसीएल कंपनीची फसवणूक केली. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.

Back to top button