सोलापूर : विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी आज निवडणूक

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी आज (दि.४) मतदान होत आहे. विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची आज दुपारी बारा वाजता विद्यापीठात बैठक होणार आहे. या बैठकीत ६५ सिनेट सदस्य मतदान करतील. तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
व्यवस्थापन परिषदेच्या एकूण आठ जागांसाठी निवडणूक लागली असून यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. पदवीधर, प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यापीठ व्यवस्थापन अशा चार गटातून आठ जागांसाठी निवडणूक लागली होती. पाच सदस्य बिनविरोध झाल्याने आता तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. पदवीधर गटातून चन्नबसप्पा बंकूर यांच्या विरोधात सचिन गायकवाड निवडणूक लढवत आहेत. शिक्षक मतदार संघातून डॉ. वीरभद्रे दंडे यांच्या विरोधात डॉ. समाधान पवार निवडणूक लढवत आहेत. प्राचार्य गटातून प्रा. निवृत्ती पवार यांच्या विरोधात डॉ. राजेंद्रकुमार शेंडगे रिंगणात आहेत. एकूण ६४ सिनेट सदस्य या तीन जागांसाठी मतदान करणार आहेत.
हेही वाचा :
- मराठी साहित्य संमेलन -साहित्यविश्वात आमचा हस्तक्षेप नाही : एकनाथ शिंदे
- कसबा, चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी लढणार; जागावाटपावर आज निर्णय
- पुणे : सरकारमध्ये महिला आघाडीला संधी देणार : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे