‘मुंबई-शिर्डी’, ‘सोलापूर-मुंबई’ वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन 10 फेब्रुवारीला होणार | पुढारी

‘मुंबई-शिर्डी’, ‘सोलापूर-मुंबई’ वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन 10 फेब्रुवारीला होणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  गतवर्षीपेक्षा यंदा रेल्वेसाठी अधिकचा निधी देण्यात आला आहे. रेल्वेची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आणि नवीन कामे हाती घेण्यासाठी अर्थसंकल्पामुळे बळ मिळेल, अशी भावना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी व्यक्त केली. पूर्वी रेल्वे अर्थसंकल्पातून कार्यनिहाय निधीची तरतूद केली जायची. यंदा एकूण अर्थसंकल्प घोषित करण्यात आला असून, हा निधी कुठल्या कामांसाठी वापरायचा यासंदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. यानंतरच महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना किती निधी मिळणार याबाबत स्पष्टता येईल, असे दानवे म्हणाले.

देशातील ब्रॉडगेज लाईनचे विद्युतीकरण पूर्ण केले जाईल, असा पुनरुच्चार दानवे यांनी केला. 400 वंदे भारत ट्रेन देशात धावतील. सध्या घोषित 10 पैकी 8 वंदे भारत ट्रेन धावत असून ‘मुंबई-शिर्डी’ आणि ‘सोलापूर-मुंबई’ वंदे भारत ट्रेनचे उदघाटन 10 फेब्रुवारीला करण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले.

महाराष्ट्रातील नागपूर-नागभीड, वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि अहमदनगर-बीड-परळी हे मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 16 हजार कोटी निधी मिळाला. यंदा यापेक्षाही अधिक निधी राज्याला मिळेल. यामुळे प्रलंबित कामे, नव्याने हाती घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यासाठी या तरतुदीचा फायदा होईल, असे दानवे म्हणाले.

Back to top button