सोलापूर द.- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी अमरजीत पाटील | पुढारी

सोलापूर द.- अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी अमरजीत पाटील

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा आणि सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये खांदेपालट होऊ लागले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि चार विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख असलेले पुरुषोत्तम बरडे यांच्या खांद्यावरील ओझे आता शिवसेनेकडून कमी करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे असलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट हे दोन विधानसभा मतदारसंघ माजी आमदार रविकांत पाटील यांचे चिरंजीव अमरजीत पाटील यांच्याकडे दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुरुषोत्तम बरडे आता सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य या मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख म्हणून कामकाज पाहणार आहेत. अमरजीत पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून इच्छुक असल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी एकूण चार जिल्हाप्रमुख होते. आता अमरजीत पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पाचवा जिल्हाप्रमुख मिळाला आहे. शिवसेनेने बरडे यांच्याकडील दोन तालुके कोणत्या कारणासाठी काढून घेतले. हे मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी आता बरडे शहर उत्तर आणि शहर मध्य विधानसभा मतदार संघावर जातीने लक्ष ठेवणार आहेत. पक्ष बांधणीच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संभाजी शिंदे यांच्याकडे सांगोला, पंढरपूर शहर व माळशिरस तालुक्याची जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी आहे. धनंजय डिकोळे हे माढा आणि करमाळा तालुक्याचे जिल्हा प्रमुख आहेत. गणेश वानकर हे मोहोळ, बार्शी, मंगळवेढा शहर व तालुका आणि उत्तर सोलापूरचे जिल्हाप्रमुख म्हणून कामकाज पाहत आहेत.

पुरुषोत्तम बरडे यांचा लोकसंग्रह चांगला

दोन किंवा तीन विधानसभा मतदार संघासाठी एक जिल्हाप्रमुख असावा अशी शिवसेनेची पॉलिसी ठरली आहे. अमरजीत पाटील हे दक्षिण सोलापुरात राहतात. त्यांना दक्षिण व अक्कलकोट तालुक्यात काम करायला सोपे जावे तसेच त्यांना कामाची संधी मिळावी, यासाठी अमरजीत पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय पुरुषोत्तम बरडे यांचे काम आणि संघटनाही चांगली आहे. त्यांची काम करण्याची पद्धत आणि लोकसंग्रह सुद्धा चांगला आहे .त्यामुळे आणखी पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने अमरजीत पाटील यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची नवीन जबाबदारी पक्षाच्या आदेशानुसार देण्यात आली आहे, असे सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात सेनेचे ८ आमदार!

निवडणुका बघून काम करणाऱ्या पक्षासारखे शिवसेनेचे काम नाही. २४ तास १२ महिने शिवसेना काम करत असते. शिवसेना तळागाळात जाऊन काम करणारी संघटना आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी कशी आणि कोणासोबत आघाडी होते?, त्या अनुषंगाने तिकीट वाटपाचे नियोजन तर होईल. परंतु, आगामी निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ७ ते ८ आमदार निवडून येतील, असा विश्‍वास संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा : 

Back to top button