धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन | पुढारी

धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळेकरांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेली 154 कोटीची पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारात गडप झाली असून या योजनेतील जलकुंभात पाणीच टाकले गेले नाही. धुळेकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज शिवसेनेने देवपुरातील जलकुंभाजवळ आंदोलन करून मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गटाचा निषेध केला.

धुळे महानगर पालिकेच्या वतीने भाजपाच्या लोकप्रतिनिधींकडून 154 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. प्रत्यक्षात या योजनेचे काम अद्यापपर्यंत अपुर्णच असून शेकङो किलोमीटरची अंथरलेली पाईपलाईन नव्याने निर्माण केलेले जलकुंभ पाण्यावाचून तहानलेलेच असून नविन जलकुंभात पाणी न टाकल्यामुळे त्यांना तडे पडून फुटण्याचा मार्गावर आले आहेत. धुळे शहराच्या चारही बाजुला पाणी आहे. सध्या धुळे शहराला तापी पाणी पुरवठा, डेडरगाव तलाव, नकाणे, हरण्यामाळ तलाव, पांझरा नदी मधून थेट पाणी उचलून पुरवठा केला जातो. तरीही आज मितीस धुळे शहर हे तहानलेले असून अद्यापही धुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात अङचणी येत आहे. सध्या चार ते पाच तर काही ठिकाणी आठ दहा दिवसाआड पाणीपुरवठा तोही कमी दाबाने केला जात आहे. लोकप्रतिनिधींकडून वारंवार दररोज पाणी पुरवठा करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. केवळ नियोजनाच्या अभावामुळे मुबलक पाणी नसून ही लोकप्रतिनिधीं नगरसेवकांच्या अकार्यक्षमतेमुळे दररोज पाणी पुरवठा होत नाही. परिणामी धुळेकर जनता पाण्या वाचून तहानलेली आहे. शहराच्या काही भागात मुबलक पाणी पुरवठा होतो. तर काही भागात आठ दिवसांनंतरही पुरेशा प्रमाणात पाणी भेटत नाही ही वस्तु स्थिती आहे. शहराची 154 कोटी रूपयांची पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचाराच्या गाळात खोलवर रूतली असून या योजनेच्या माध्यमातून मनपातील ओव्हरसिअर, अधिकारी, लोकप्रतिनिधीं यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले असल्याचा आरोप यावेळी भाजप आंदोलकांनी केला.  मनपा प्रशासनाच्या या अर्कायक्षमते विरोधात, मनपात चाललेल्या भ्रष्टाचारा विरोधात शिवसेनेने आज सलग अकराव्या दिवशी मनपाच्या 154 कोटी पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत फाॅरेस्ट काॅलनीतील प.हरीवंशराय बच्चन जलकुंभ येथे आंदोलन केले.

हा जलकुंभ गेल्या तीन वर्षांपासून भरलाच गेला नसल्याने या जलकुंभाला ठिकठिकाणी तडे गेले असून शासनाचे कोट्यावधी रूपये पाण्यात गेले आहेत. या योजनेची चौकशी करण्यात येवून दोषींवर कारवाईची मागणी आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे माजी आ.प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख डॉ.सुशील महाजन, धीरज पाटील, संघटक देवीदास लोणारी, राजेश पटवारी, ललित माळी, भरत मोरे, संदीप सुर्यवंशी, मच्छिंद्र निकम, विनोद जगताप, महादु गवळी, संजय जवराज, प्रविण साळवे, छोटु माळी, कैलास मराठे, हिमांशु परदेशी, पंकज भारस्कर, पिनु सुर्यवंशी, राजेश पाटील, संदिप चौधरी, अमोल ठाकूर, गुलाब धोबी, नाना शिंदे, शुभम रणधीर, तेजस सपकाळ आदींनी केली आहे.

Back to top button