

सोलापूर : अंबादास पोळ : राज्य कोणते का असेना, तेथे कार्यरत असलेल्या शासनाने त्या त्या भागातील जनतेच्या भावना समजावून घेऊन विकास करावा. असुविधा जाणवू नये, याची दक्षता घ्यावी. मूलभूत सुविधा देऊन जनतेचे मन जिंकावे आणि विकासाचे एक आदर्श मॉडेल जगासमोर ठेवावे, अशी अपेक्षा कर्नाटकमधील आमदार यशवंतगौडा पाटील यांनी व्यक्त केली. प्रांत, भाषा, सीमावाद या पार्श्वभूमीवर गदारोळ सुरू असताना खासगी कार्यक्रमानिमित्त सोलापूर दौऱ्यावर ते आले होते, यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, विकास आणि सुविधेचा मुद्दा ज्यावेळी पुढे येतो, त्यावेळी जनता विविध मागण्या, मतं घेऊन लोकप्रतिनिधींसमोर येतात. त्यावेळी त्यांना भेडसावत असलेले प्रश्न काय आहेत याचा अभ्यास करून तत्काळ निपटारा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. ही कामे करण्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक असणे आवश्यक आहे. तरच ही कामे तत्काळ मार्गी लागतात. एकेकाळी अनेक समस्यांचे आगार असलेल्या इंडी तालुका सध्या विकासाचे रोल मॉडेल देशांमध्ये ठरत आहे. अनेक मान्यवरांकडून त्याचे कौतुकही होत आहे. अशा पद्धतीने अन्यत्र विकास होणे अपेक्षित आहे. विकास एका दिवसात होणे शक्य नाही, त्यासाठी नियोजन, सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून त्या त्या भागातील नागरिकांच्या मानसिकतेबरोबरच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची भावना, तळमळही महत्त्वाचे असल्याचे आ. यशवंतगौडा पाटील यांनी सांगितले. यावेळी कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी, कर्नाटक रक्षणा वेदिकेचे जिल्हाध्यक्ष मल्लिनाथ करपे, सामाजिक कार्यकर्ते शिवसिद्ध बुळ्ळा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्नाटकामध्ये एफआरपीनुसार उसाचा दर दिला जातो, तो दर शेतकऱ्यांना परवडेल आणि कारखान्याला पेलेल, अशा पद्धतीने काढण्यात येतो. याच पद्धतीने दर दिला जात असल्याने ऊस दर देण्यासंदर्भात कर्नाटकातील साखर कारखानदार हे शेतकऱ्यांचे समाधान करत आहेत. प्रत्येक साखर कारखानदारांनी या सगळ्या बाबींचा विचार करून तो दर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा देणे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे काम आहे. त्याबरोबरच शिक्षण आणि आरोग्यासाठी मोलाचे योगदान द्यावे. यासाठी विविध विभाग कार्यरत असून त्या त्या विभागातील निधी आणून ही कामे करता येतात, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिका हद्दीला ज्या टाकळी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातून पाणीपुरवठा केला जातो, त्याच टाकळीतून नियोजनबद्धपणे इंडीला २४ तास उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. इंडीतील घराच्या तिसऱ्या मजल्यावरसुद्धा मोटर न लावता पाणी पोहोचते. हे नियोजनामुळे शक्य झाल्याचे आ. यशवंतगौडा पाटील यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?