Sanjay Raut : मोदींचा झालेला अपमान भाजपला दिसतो, शिवरायांचा दिसत नाही? | पुढारी

Sanjay Raut : मोदींचा झालेला अपमान भाजपला दिसतो, शिवरायांचा दिसत नाही?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खरगे यांनी एका भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 100 तोंडाचा रावण असे म्हटले. त्याच्यावर पंतप्रधानांनी अश्रू ढाळले, हा माझा अपमान नसून गुजरातचा अपमान असल्याचे सांगितले. त्यावर आता विधानसभेची निवडणूक लढवली जात आहे. खरं तर त्यांना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही भाजप व शिंदे गट गप्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? त्याचावर कुणीच का बोलत नाही असा सवाल संजय राऊत यांनी भाजप व शिंदे गटाला करत निशाणा साधला. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राऊत पुढे म्हणाले,  मोदींचा अपमान झालेला भाजपला दिसतो, मात्र शिवरायांचा अपमान दिसत नाही? महाराष्ट्रात शिवरायांचा रोज अपमान सुरु आहे. भाजपमध्ये महाराजांचा अपमान करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. शिवाजी महाराजांबद्दल यांच्या मनात किती आस्था व श्रद्धा आहे हे यातून दिसतय. पण याला उत्तर दिलं जाईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

पालापाचोळा उडून गेला म्हणून फरक पडत नाही

बंडखोर आमदारांविषयी विचारले असता राऊत म्हणाले, पालापाचोळा उडून गेला म्हणून फरक पडत नाही. शिवसेना आहे तशीच आहे. बंडखोरांवर जनतेचा राग आहे. आज सरकार आहे, सुरक्षा आहे म्हणून ठिक आहे. पण या आमदारांचे भविष्य मला सुरक्षित दिसत नाही. त्यांच्यात विनासुरक्षा फिरण्याची हिंमत नाही. त्यांना सुरक्षा आहे कारण त्यांना भिती आहे. जनता त्यांच्यावर खवळलेली आहे हे त्यांना माहित आहे. आम्हाला सुरक्षा नाही, आणि कसली भितीही नाही असे राऊत म्हणाले.

शिंदे गटात अंतर्गत ठिणग्या…

शिंदे गटात काय सुरु आहे, ते मला चांगले माहिती आहे. त्यांच्यात अंतर्गत ठिणग्या उडत आहेत. त्याचा स्फोट होईल तेव्हा वस्तूस्थिती समोर येईल. मी गद्दार किंवा खोके वाल्यांसाठी पत्रकारपरिषद घेतलेली नाही. मात्र, एक सांगतो, पिढ्यानपिढ्या त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. तसेच जे खासदार सोडून गेले त्यांनी स्व:ची राजकीय कबर खोदली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button