सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आघाडीवर | पुढारी

सोलापूर : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक आघाडीवर

सोलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये (Bhima Sugar Factory) निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रांवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये भाजपचे (BJP) खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) आघाडीवर आहे. त्यामुळे मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील महाडिक समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.

मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दोन फेरीत होणार असून, पहिल्या फेरीचा निकाल हाती लागला आहे. पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील ७५०० मतांची मोजणी झाली आहे. दुसऱ्या फेरीतही तेवढेच मतदान आहे. दुसऱ्या फेरीमध्ये खासदार धनंजय महाडिक हे आघाडीवर राहिले, तर त्यांची भिमा कारखान्यावर एक हाती सत्ता येणार आहे.

पहिल्या फेरीमध्ये आंबेचिंचोली, पुळूज, पुळूजवाडी, फुलचिंचोली, शंकरगाव, विटे, उचेठाण, ब्रम्हपुरी, औंढी, टाकळी सिकंदर, पेनूर, पाटकूल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी व तारापूर या केंद्रवरील मतमोजणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत खासदार धनंजय महाडिक यांची ‘कपबशी’ (भीमा परिवार पॅनेल) आघाडीवर आहे.

दुसऱ्या फेरीत तुंगत, सुस्ते, अंकोली, अर्धनारी, इंचगाव, वडदेगाव, बेगमपूर, वाघोली, शेजबाभूळगाव, येणकी, विरवडे बुद्रूक, कोथाळे, काटेवाडी, कुरुल, सोहाळे, वडवळ, ढोकबाभूळगाव, पोखरापूर, गोटेवाडी, नजिक-पिंपरी, पापरी, येवती, कोन्हेरी, खंडाळी आणि भीमा कारखाना कॉलनी या केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत एकूण १९ हजार ४३० पैकी १५ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या फेरीत महाडिक गटाने आघाडी घेतली आहे.

मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील महाडिक समर्थकांनी जल्लोषाची तयारी केली आहे. दुसऱ्या फेरीत आम्हीच बाजी मारू, असा दावा माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान दुसऱी फेरी होण्यापूर्वी लंच ब्रेक झाला आहे.

हेही वाचा : 

Back to top button