पुणे : पीएमपीच्या 358 सीएनजी बस जाणार भंगारात | पुढारी

पुणे : पीएमपीच्या 358 सीएनजी बस जाणार भंगारात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी ताफ्यातील 358 सीएनजी बस भंगारात काढणार आहेत. या गाड्यांचे आयुर्मान संपल्यामुळे पीएमपी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे एकीकडे पुणेकरांना अगोदरच गाड्या कमी पडत असल्याचे चित्र असताना आणखी गाड्या कमी पडणार असल्याचे दिसत आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 गाड्या आहेत.

त्यापैकी 1 हजार पीएमपीच्या आहेत, तर 1100 भाडेतत्त्वावरील आहेत. या गाड्या शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेने खूपच कमी आहेत. त्यामुळे शहरात पीएमपीच्या गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. आणि आता जवळपास 400 गाड्या ताफ्यातून कमी होणार असल्यामुळे प्रवाशांचे आणखी हाल होणार आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे या भंगारात जाणार्‍या सीएनजी बस स्वमालकीच्या असणार आहेत. त्यामुळे आता पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या फक्त 600 बसच उपलब्ध असणार आहेत.

नव्या गाड्या ठेकेदारांच्या की स्वमालकीच्या?
पीएमपीच्या ताफ्यातील 358 गाड्या कमी होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना गाड्या कमी पडणार आहेत. त्यामुळे पीएमपीला आता तत्काळ नव्या गाड्या खरेदी कराव्या लागणार आहेत. परंतु, पीएमपी प्रशासन आता नव्या गाड्या भाडेतत्त्वावरील खरेदी करणार की स्वमालकीच्या खरेदी करणार, आता हे पाहावे लागणार आहे.

बसचे प्रकार आणि संख्या
सीएनजी – 1594 श्र डिझेल – 150
भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक – 398

पीएमपीच्या बससंख्या…
पीएमपी स्वमालकीच्या – 1012
भाडेतत्त्वावरील बस – 1130
एकूण गाड्या 2 हजार 142

एका ई-बसच्या किमतीत
तीन सीएनजी बस…
सीएनजी बस – 44 लाख रुपये (1 बस किंमत)
ई-बस किंमत – दीड कोटीपेक्षा अधिक

Back to top button