सोलापूर : वळसंगमध्ये साकारणार सांस्कृतिक भवन, धम्म, विपश्यना केंद्र अन् वाचनालय

सोलापूर : वळसंगमध्ये साकारणार सांस्कृतिक भवन, धम्म, विपश्यना केंद्र अन् वाचनालय

सोलापूर : जगन्नाथ हुक्केरी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या आठवणी आजही ताज्या आहेत. या आठवणी चिरकाल स्मरणात राहाव्यात यासाठी ऐतिहासिक वास्तू उभारणीचे नियोजन करण्यात येत असून यासाठी चार कोटींचा आराखडा तयार केला आहे. यातून सांस्कृतिक भवन, धम्म, विपश्यना केंद्र, वाचनालयासह अन्य वास्तू उभारण्यात येणार आहेत. यासाठी ३७ लाख निधी मंजूर झाला, तर आणखी एक कोटीचा निधी लवकरच मंजूर करण्याची हमी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे १९३७ पूर्वी दलित बांधवांनी स्वतःच्या वस्तीसाठी स्वतंत्र सार्वजनिक आड (विहीर) श्रमदान व लोकवर्गणीतून बांधली. त्याच सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती समाजबांधवांना मिळाली. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वळसंगला येऊन या विहिरीतील पाण्याला स्पर्श करत नाहीत आणि प्राशन करत नाहीत, तोपर्यंत आडाचे पाणी प्यायचे नाही, असा निर्धार केला होता. सामाजिक कार्यकर्ते भुजंगप्पा रुई, तेजप्पा वाघमारे, ओंकारी गायकवाड, विजय गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कानावर ही माहिती घातली. एवढ्यावरच बाबासाहेबांनी वळसंगला येण्यास होकार दिला.

तत्काळ २४ एप्रिल १९३७ रोजी वळसंगला त्यांनी भेट दिली आणि विहिरीतील पाणी पिले. ज्यावेळी बाबासाहेब वळसंगला आले होते, तेव्हा त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी स्वातंत्र्यसैनिक गुरुसिद्धप्पा आंटद यांनी स्वतःची बैलगाडी उपलब्ध करून दिली होती. यातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आता याच विहिरीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

पाण्यासाठी चांदीची वाटी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विहिरीला भेट दिल्यानंतर समाजबांधवांना मोठा आनंद झाला होता. त्यांनी चांदीच्या वाटीत पाणी शेंदून ते बाबासाहेबांना प्राशन करायला लावले. त्या आठवणीचा ठेवा जतन केलेली विहीर वळसंगमध्ये आजही आहे. आता त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

चार कोटींचा आराखडा

चार कोटींच्या आराखड्यामध्ये सांस्कृतिक भवन ४५ लाख, धम्म केंद्र ७५ लाख, विपश्यना केंद्र ५० लाख, वाचनालय ४५ लाख, प्रशिक्षण केंद्र ४५ लाख, अंतर्गत रस्ते ३० लाख, सीमांकन भिंत ४० लाख, ब्युटीफिकेशन १५ लाख, लँडस्केपिंग १२ लाख १४ हजार ३०० रुपये असा आराखडा आहे.

३७ लाख निधी मंजूर

सध्या जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून बचत गट भवनला २२ लाख, ऐतिहासिक स्थळाकडे जाणार्‍या सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी १५ लाख असा ३७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. लवकरच एक कोटीचा निधी देण्याची हमी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. उर्वरित निधी मंजुरीसाठी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. संजय गायकवाड, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते दिनकर नारायणकर, शांतकुमार गायकवाड, दीपक गायकवाड, रवी गायकवाड, संजयमामा गायकवाड यांच्यासह समाजबांधव प्रयत्न करत आहेत.

वळसंग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली विहीर ही ऐतिहासिक ठेवा आहे. यामुळे प्रेरणा मिळणार आहे. यासाठी विविध वास्तू उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आता थोडा निधी मंजूर झाला आहे. उर्वरित निधी देण्याची हमी शासनाकडून मिळाली आहे.
– रवी गायकवाड, माजी जयंती उत्सव अध्यक्ष, वळसंग

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news