राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार | पुढारी

राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ठाण्यात मंगळवारी झालेल्या जाहीर सभेत बोचरी टीका केली होती. या टीकेला शरद पवार यांनी आज (बुधवार) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. शिवरायांचे नाव घेत नाही, हा आरोप खोटा आहे, असे सांगून राज ठाकरे यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे शरद पवार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, राज ठाकरे सहा महिन्यांमधून एखादे विधान करत आहेत. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवाजी महाराजांबाबत शाहू, फुले, आंबेडकर यांना आस्था होती. शाहू, फुले, आंबेडकर यांचा उल्लेख म्हणजे शिवरायांच्या विचारांची मांडणी आहे. शिवरायांना घडविण्यात राजमाता जिजाऊंचे योगदान मोठे होते, असेही पवार म्हणाले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत मी याआधी बोललो होतो. पुरंदरेंच्या माहितीच्या आधारे जेम्स लेनकडून चुकीचे लिखाण केले आहे, असा आरोप पवार यांनी करून पुरंदरेवर टीका करणाऱ्यांचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबाबत माझी भूमिका जाहीर होती. त्यामुळे काँग्रेससोबत जाण्याची भूमिका ऐनवेळी बदलली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज यांच्या भाषणावर टीका करताना पवार म्हणाले की, त्याच्या भाषणात मुळ मुद्द्यांना बगल देण्यात आली. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर ते काहीही बोलले नाहीत. त्यांच्या भाषणात सामान्यांची एकही प्रश्न आला नाही. महागाईवर ते गप्प का राहिले असाही सवाल पवार यांनी यावेळी केला.

राज ठाकरे यांचे वाचन कमी आहे. त्यामुळे त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे लिखाण वाचावे, असा सल्ला त्यांनी दिला. शरद पवार नास्तिक आहेत, ते कुठल्या मंदिरात गेलेले पाहिले आहे का ? राज ठाकरे यांच्या या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मी बारामतीतील मंदिरात जात असतो. पण मंदिरात जाण्याचा गाजावाजा करत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी घरावर केलेल्या हल्ल्यावर ते म्हणाले की, मी कामगारांना दोष देत नाही. पण न्यायालयाच्या निर्णयावर कामगारांकडून जल्लोष करण्यात आला. मग दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर हल्ला का ? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. ईडी कारवाईबाबत ते म्हणाले की, अजित पवार यांच्याबाबत जे झाले ते माझ्याकडेही झाले. अजित पवार, सुप्रिया सुळे बहिण भाऊ आहेत, ते वेगळे नाहीत.

राज्यात सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याची शांतता संकटात आणली जात आहे, असे सांगून महाराष्ट्राच्या ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केला. राज्यातील मनसेला मतदारांनी संपवलं, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का? 

Back to top button