

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : जागतिक परिचर्या दिनानिमित्त भारत सरकारकडून दिला जाणारा 'राष्ट्रीय फोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१' सोलापूरच्या मनिषा भाऊसाहेब जाधव यांना देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज (दि ७) त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून त्यांची निवड झाली होती. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम ५० हजार रूपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
१२ मे १८१० हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्या दिन " म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारद्वारे प्रत्येकवर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस 'फ्लोरेन्स नाइटिंगेल' यांच्या नावाने पुरस्कार बहाल केला जातो. आरोग्यसेवेतील चांगले काम पाहून मनिषा जाधव यांची या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली होती. आज हा पुरस्कार राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मनिषा या गेल्या १८ वर्षांपासून आरोग्य परिचारिका म्हणून सेवा निभावत आहेत. प्रथमच सोलापूर जिल्ह्यामधून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या गुरसाळे (ता. माळशिरस) या जन्मगावी झाले. त्यानंतर त्यांनी कामा आणि अल्बलेस रुग्णालय मुंबई येथे आरोग्य सेविकेचे प्रशिक्षण २००२ साली पूर्ण केले. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेविका या पदावर रुजू झाल्या होत्या. आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. कोरोना काळामध्ये एकाच दिवशी ४३२ कोरोना टेस्ट आणि तीन दिवसांमध्ये ११०० कोरोना टेस्ट केल्याने त्यांच्या कामाची जिल्ह्यात प्रशंसा केली गेली होती.
हेही वाचा :