पुणे : काठिण्य पातळीमुळे फुटला घाम; विद्यापीठाच्या ‘पेट’साठी 72 टक्के विद्यार्थ्यांनी लावली हजेरी | पुढारी

पुणे : काठिण्य पातळीमुळे फुटला घाम; विद्यापीठाच्या ‘पेट’साठी 72 टक्के विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. प्रवेशांसाठी रविवारी पेट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी एकूण 12 हजार 752 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती; त्यापैकी 9 हजार 182 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण हे 72 टक्के होते; परंतु पेट प्रवेश परीक्षेची काठिण्य पातळी अधिक जाणवल्याने विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवताना अक्षरश: घाम फुटला.

पुणे विद्यापीठाची पेट परीक्षा पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील एकूण 33 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. सकाळच्या सत्रात साडेदहा ते साडेबारा, तर दुपारच्या सत्रात अडीच ते साडेचार या दोन सत्रांमध्ये पेट परीक्षा यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली.

या परीक्षेत विचारण्यात आलेल्या, प्रश्नांची काठिण्य पातळी अधिक असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पेट परीक्षा सुरळीत पार पाडली असली, तरी प्रश्नपत्रिका मराठीत उपलब्ध न झाल्याने काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घ्यायला अधिक वेळ द्यावा लागला. मात्र, पुरेसा वेळ असल्याने, विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रश्न सोडविले.

प्रश्नपत्रिका फक्त इंग्रजीतून
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नेट परीक्षा गेल्या महिन्यात ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजण्यासाठी फायदा झाला. पेट परीक्षेसाठी अर्ज भरताना, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मराठी माध्यमाचा पर्याय देण्यात आला होता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात परीक्षेत इंग्रजी माध्यमातून प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे प्रश्न समजण्यास अडचणी आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले

Back to top button