सोलापूर : विजयपूरच्या बसव भवनमध्ये महाराष्ट्राची ‘भक्तीवाणी’; श्रावणानिमित्त महिनाभर पुराण | पुढारी

सोलापूर : विजयपूरच्या बसव भवनमध्ये महाराष्ट्राची 'भक्तीवाणी'; श्रावणानिमित्त महिनाभर पुराण

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला फार महत्त्वाचे स्थान आहे. विविध सण, उत्सव याच महिन्यात येतात.  बहुतांश धार्मिक स्थळांमध्ये अध्यात्मिक कार्यक्रमांबरोबरच पुराण, प्रवचन, कीर्तनाचे आयोजन केले जातात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ येथील वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांच्या वाणीतून विजयपूर येथील मठात ‘हुबळीचे सिद्धारूढ महास्वामी’ यांच्यावर पुराण सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तीर्थच्या वाणीतून पवित्र श्रावण महिन्यात कर्नाटकाला संस्कार, संस्कृती, धार्मिकतेचे धडे मिळत आहेत.

महाराष्ट्रातील मठ, मंदिरे, धार्मिक स्थळांमध्ये कर्नाटकातील शास्त्री, महंत, संत, मठाधीश यांना पाचारण करून त्यांच्या माध्यमातून अध्यात्मावर संस्कार वर्ग चालवले जातात. या संस्कार वर्गामधून पुराण, प्रवचन, कीर्तन दिले जाते. या परंपरागत परंपरेला फाटा देत वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ विजयपूरच्या बसव भवनमध्ये महिनाभर ‘हुबळीचे सिद्धारूढ महास्वामी’ यांच्यावर पुराण सांगणार आहेत.

आत्तापर्यंत त्यांनी कर्नाटकातील अनेक गावांमध्ये अध्यात्मावर प्रवचन व पुराण सांगितले आहेत. शिवाय पौरोहित्यही केले आहेत. यामुळे त्यांना मानणारा वर्ग कर्नाटकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बसवराज शास्त्री यांचा पंचांग सांगण्यातही  मोठा हातखंडा आहे. याशिवाय अध्यात्माला सामाजिक जोड देत तीर्थ येथील सोमेश्वर मठाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमही ते राबवितात.

आतापर्यंत तेलेकुणी (ता. आळंद, जि. कलबुर्गी), अब्बे तुमकुर, विजयपूर या कर्नाटकातील गावामध्ये त्यांच्या वाणीतून प्रबोधन घडले आहे. महाराष्ट्रात हन्नूर, नन्हेगाव, गावांमध्ये १७ वर्ष आणि शिंगडगावमध्ये तब्बल ११ वर्ष त्यांनी प्रवचन दिले आहे. मराठवाड्यातही त्यांच्या पुराणाचे कार्यक्रम झाले आहेत. रसाळ वाणी, ओघवती शैली, त्याला विनोदाची झालर आणि सध्या समाजामध्ये सुरू असलेल्या वास्तवावर व्यंगात्मक बाण सोडत मनोरंजन करत संस्काराचे बीज समाजाच्या मनामध्ये पेरत आहेत.

आतापर्यंत या विषयावर प्रबोधन

कलबुर्गीचे शरणबसवेश्वर, सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर, गुड्डापूर धानम्मा, घत्तरगी भाग्यवंती, हुबळीचे सिद्धारूढ यासह असंख्य विषयावर आणि महापुरुषांच्या जीवन चरित्रावर सात दिवसांपासून ते  तीन महिने या कालावधीत त्यांनी पुराण सांगितले आहेत. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवस कालावधीमध्ये देवीपुराण सांगून स्त्री शक्तीचा सन्मानही त्यांनी केला आहे.

     हेही वाचलंत का?

Back to top button