

पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबेल. त्यामुळे उजनी जल पर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटीचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बुधवारी (दि.21) मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुनिता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला. यानंतर समितीकडून या आराखड्यासाठी 282.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
जिल्ह्यात संपूर्ण जगातील पर्यटकांना जल, कृषी, विनयार्ड व धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणे हा या एकात्मिक पर्यटन प्रकल्पाचा आत्मा व यु. एस. पी. देखील आहे. यासाठी प्रकल्पातून जिल्ह्यात एकात्मिक पर्यटन सर्किट विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने जिल्ह्यात वेगवेगळी पथदर्शी उदाहरणे (कृषी पर्यटन, कृषी मॉल, जल पर्यटन ई बाबतची मॉडेल्स) उभी राहतील की, जी पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील उद्योजकांना पर्यटन क्षेत्रातील विविध संधी दर्शवतील व यासारखे उपक्रम एक व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रेरणा देतील. यामुळे जिल्ह्यात पुढील 8-10 वर्षात पर्यटन उद्योगात मोठी आर्थिक गुंतवणूक होऊन विकासाची प्रकिया वेग धरेल व एकंदरीत स्थानिक व जिल्ह्यावासियांचे जीवनमान उंचावेल.
प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये :
पक्षी निरीक्षण व नौकायन : पर्यटकांना उजनी जलाशय परीसरात पक्षी निरीक्षण आणि नौकायनासाठी एक स्वप्नभूमी असेल.
स्थानिकांचा प्रकल्पात सक्रीय सहभाग : स्थानिक महिला गट व शेतकरी उत्पादक गटांचा प्रकल्पात सक्रीय सहभाग.
उपजीविका विकास : प्रकल्पातून स्थानिकांचा पर्यटनावर आधारित उपजीविका विकास/ बळकटीकरणावर भर.
डिजिटल वेब पोर्टल : पर्यटन सर्किट व त्यातील स्थळांच्या प्रभावी मार्केटिंग तसेच पर्यटकांना टूर बुकिंगसाठी एक उपयुक्त साधन.
सर्वांसाठी पॅकेजेस : पर्यटकांच्या सर्किट मध्ये राहण्याचा कालावधी व खर्च करण्याची क्षमता यांचा विचार करून टूर पॅकेजेस निर्मिती व प्रचार.
स्थानिकांची क्षमता बांधणी : इच्छुक बचत गट, उत्पादक गट, उद्योजक यांच्या कौशल्य विकासावर भर.
एकात्मिक पर्यटन सर्किटमध्ये उजनी धरणातील जल पर्यटन हे पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण असेल. पर्यटकांना यासोबतच येथे धरणाच्या जलाशयाचा भाग, सभोवतालील निसर्गरम्य परिसर, जल क्रीडा उपक्रम, विविध देशी तसेच विदेशी पक्षी, ईत्यादीचे नैसर्गिक सौंदर्य न्याहाळता येईल. पुढे सर्किट मध्ये परिसरातील कृषी पर्यटन केंद्रे, धार्मिक स्थळे, विनयार्ड पर्यटन, तलाव, किल्ले, वारसा स्थळे यांना भेटी देता येतील. पर्यटकांना साधारणत: आठवडाभर पर्यटन सर्किटमध्ये असलेल्या विविध स्थळांना (जल, धार्मिक, कृषी, नैसर्गिक विनयार्ड पर्यटन स्थळांना) भेटी देऊन पर्यटनाचा आस्वाद घेता येणार आहे. निश्चितच यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटन पूरक उद्योग वाढतील, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल व यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होऊन जिल्ह्याची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढण्यासाठी गती मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग उभे राहण्यास चालना मिळेल व त्यामुळे टूर गाइड, हॉटेल आणि रिसॉर्ट कर्मचारी, अन्न आणि पेय सेवा कर्मचारी, ट्रॅव्हल एजंट, वाहतूक सेवा (बस, कार, टॅक्सी) सुविधा देणारे, विविध कार्यक्रमांचे नियोजन करणारे, मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे कलाकार / लोक कलाकार, दुकानदार व किरकोळ वस्तू विक्रेते, संग्रहालय आणि वारसा साइट कर्मचारी, संवर्धन कामगार, ग्राहक सेवा प्रतिनिधी, बांधकाम व देखभाल दुरुस्ती कामगार, स्पा आणि वेलनेस कर्मचारी, स्वच्छता सेवा सुविधा देणारे कामगार यांचेसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.