सातारा : मुनावळेत 100 कोटींचे अत्याधुनिक पर्यटन केंद्र
बामणोली; पुढारी वृत्तसेवा : मुनावळे (ता. जावली) येथे स्कुबा डायविंगसह 100 कोटींचे अत्याधुनिक पर्यटन केंद्र होणार असून, यामध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा असणार आहेत. या प्रकल्पाची नोंद जागतिक स्तरावर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुनावळे, ता. जावली येथे होणार्या स्कुबा डायविंग या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, तहसीलदार हणमंत कोळेकर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. या पर्यटन स्थळावर अत्याधुनिक प्रकारचे स्कुबा डायविंग होणार असून हा प्रकल्प सुमारे 100 कोटींचा आहे. यात सर्व बोटीही अत्याधुनिक असणार आहेत. या बोटींमध्ये पर्यटकांना निवास, जेवण वगैरे सर्व सुविधा मिळणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 च्या निवडणुकीवेळी प्रचारासाठी ज्यावेळी सातार्यात आले होते त्यावेळी सातारा जिल्ह्याला निसर्गसंपत्तीचे वरदान लाभलेले असून येथे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ होऊ शकते, असे ते म्हणाले होते. त्यांचे त्यावेळचे बोलणे आता आम्ही प्रत्यक्षात उतरवत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. या प्रकल्पामुळे या भागातील पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.
एकनाथ खडसे यांची आस्थेवाईक विचारपूस; एअर अॅम्ब्युलन्सची दिली सुविधा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचा फोन खडसे यांच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्यस्त कामातूनही खडसे यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. त्यांच्यासाठी तत्काळ एअर अॅम्ब्युुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना फोनवरून दिल्या. याची तत्काळ कार्यवाही करून आपणास सर्व माहिती कळवण्यास मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी केली पर्यटनस्थळांची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून शिवसागर जलाशय, स्कुबा डायविंग, वासोटा किल्ला, नागेश्वर, आहिर-तापोळ्यादरम्यान होणारा नियोजित पूल या पर्यटनस्थळांची पाहणी केली.

