जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन | पुढारी

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (दि.५) सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.२० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन करुन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दर्शन घेतले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते.

तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला.
यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले पालखीचे सारथ्य

सराटी (ता. इंदापूर) येथून पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.

अकलूज नगरपरिषदेच्या वतीने पालखीचे स्वागत

अकलूज येथील गांधी चौकात नगर परिषदेच्यावतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे यांच्यासह अकलूज परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. तद्नंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करुन अश्व रिंगणी धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला. अश्वाचे रिंगणात धावणे, हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसले होते. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.

या रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button